जामखेडच्या शिक्षकाचा दिल्लीत गौरव; रविंद्र भापकर यांची आयसीटी पुरस्कारासाठी निवड

435

जामखेडचे रविंद्र भापकर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरदवाडी येथे उपाध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नुकतीच प्रतिष्टेच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. दरवर्षी शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या देशातील निवडक शिक्षकांचा राष्ट्रपतींच्याहस्ते या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

केंद्र सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे हे पुरस्कार दिले जातात. यासाठी राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरस्काराचा कोटा ठरलेला आहे. संपूर्ण देशातील शिक्षकांसाठी एकूण 87 पुरस्कार असतात. यंदा 43 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. महाराष्ट्रात भापकर यांच्यासह आतापर्यंत केवळ 6 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला आहे. 23 डिसेंबरला नवी दिल्लीत मान्यवरांच्या उपस्थितीत देशातील 43 व महाराष्ट्रातील 3 शिक्षकांना हा सन्मान दिला जाणार आहे.

भापकर यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण सोपे व्हावे म्हणून ई सहित्याची निर्मिती केली आहे. त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी स्वतः शैक्षणिक वेबसाइट तयार केली आहे. या वेबच्या माध्यमातून आपण कथा ,कविता ,पाठ्यपुस्तके,ऑनलाइन टेस्ट, ऑफलाइन टेस्ट, विविध अॅप्स मोफत डाउनलोड करू शकतो. राज्यातील लाखो शिक्षक व विद्यार्थी या वेबचा नियमित वापर करतात. आजपर्यंत या वेबला 30 लाख पेक्षा जास्त भेटी झाल्या असून इतक्या मोठ्या प्रमाणात वापर होत असलेली ही राज्यातील शैक्षणिक वेब आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध अॅप्स तयार केले असून राज्यातील लाखो विद्यार्थी त्याचा वापर करतात. भापकर यांच्या शाळेत एकूण 45 विद्यार्थी असून शाळेचे दोन्ही वर्ग डिजिटल आहेत. दोनही वर्गात इंटरएक्टिव बोर्ड बसवले असून विद्यार्थी अत्याधुनिक शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे त्यांना इंटरएक्टिव बोर्डसाठी अमेरिकेतून मदत मिळाली आहे. भापकर राज्य तसेच देश पातळीवर तंत्रस्नेही म्हणून मार्गदर्शन करतात. त्यांनी आतापर्यन्त भोपाळ (मध्य प्रदेश) अजमेर (राजस्थान) ,दिल्ली या ठिकाणी तंत्रज्ञान कार्यशाळेत सहभाग नोंदविला आहे. तसेच राज्यात 100 ठिकाणी तंत्रस्नेही कार्यशाळा घेवून शिक्षकांना तंत्रज्ञानाची गोडी लावली आहे. नगर जिल्ह्यातील 60 शाळांचा विदेशातील अनिवासी हिंदुस्थानींशी ग्लोबल नगरी व्हिडिओकॉन्फरंसिंग कार्यक्रमाद्वारे संवाद घडवून आणण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना पत्र पाठवून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा आदींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या