साहित्य जगत – 31 मार्चची आठवण

>> रविप्रकाश कुलकर्णी

सुंदर चित्रपटाच्या उत्कट प्रसंगाशी आपण किती एकरूप होतो! तसाच प्रसंग. सारं थिएटर त्यात गुंतून गेलेलं होतं. अचानक क्षणभरात सिनेमा थांबला. खरं तर रील तुटल्यामुळे रसभंग होणे बाद झाल्याचे हे दिवस. मग असं कसं झालं, असा विचार येत असतानाच पडद्यावर बाई आली. आधीच असलेल्या शांततेत अधिक भर पडली, मग कुजबुज वाढली…

…आणि क्षणार्धात सारे प्रेक्षक उभे राहिले.

असा प्रसंग सिनेमाच्या इतिहासात घडला नसेल!

स्थळ होतेः मराठा मंदिर, मुंबई.  चित्रपट होता ‘पाकिजा’ आणि तो दिवस होता गुरुवार 31 मार्च 1972.

मीनाकुमारी गेल्याचं वृत्त मराठा मंदिरमध्ये अशा रीतीने दाखवलं होतं. त्यामुळे यच्चयावत प्रेक्षकांचं पाणी पाणी झालं हे जाणवत होतं.

हा प्रसंग आता इतकी वर्षे झाली तरी मनावर कोरल्यासारखा गडद होऊन बसला आहे.

ऐन चाळिशीत एखाद्याला असं मरण यावं ?

मीनाकुमारी पडद्यावर कधीच वाईट दिसली नाही…ना कधी तिचा अभिनय, तिचा आवाज,तर तिचे संवाद हृदयात घर करणारे.

तिच्या आयुष्याचे एकूण धिंडवडे निघालेले कळत होते, पण पडद्यावरच्या त्या कारुण्यमूर्तीला कधी तडा गेला नाही.

तिच्याच शब्दांत तिने जणू आपली गाणी सांगितलेली आहेत…

चांद तनहा है, आसमा तनहा 

दिल मिला है, कहां कहां तनहा 

जिंदगी क्या इसी को कहते है 

जिस्म तनहा है और जां तनहा 

हमसफर कोई गर मिले भी कही

दोनो चलते रहे यां तनहां 

खरं तर मीनाकुमारीबद्दल बरंवाईट इतपं माहीत झालं आहे की, एखाद्याला प्रश्न पडावा, आता तिच्याबद्दल काय सांगायचं बाकी आहे!

तरी नवनवे लेखक मीनाकुमारीबद्दल लिहीत असतात. हा मीनाकुमारीचा करिश्मा आहे.

आता तर चित्रकार आणि लेखक श्रीकांत धोंगडे यांनी मीनाकुमारीचं दुर्लभ चरित्र लिहायचा घाट घातला आहे.

त्यात हजार तरी पह्टो नक्की असणार आहेत.

माहितीने भरपूर असलेले चरित्र आजवरच्या मीनाकुमारीच्या पुस्तकांपेक्षा वेगळे असणार आहे.

त्याची झलक म्हणून सांगतो, पुस्तक येण्याच्या आधीच पुस्तकासाठी त्यांनी बुकमार्क केला आहे.

अर्थात त्यावर मीनाकुमारीचा पह्टो असणार हे गृहितच आहे.

असे बुकमार्क त्यांना माहीत असलेल्या  मीनाकुमारीच्या चाहत्यांकडे ते रवाना करत आहेत.

यानिमित्ताने त्यांच्याशी बोलताना मग मी माझं पण थोडंसं सांगितलं.

मीनाकुमारीला सात-आठ वेळा भेटायचा योग आला, पण आपलेपणा निर्माण झाला तो राम औरंगाबादकरांनी ‘माझी ओळख’ करून दिली म्हणून!

आताच्या छत्रपती संभाजीनगरला राम औरंगाबादकर यांच्या सांगण्यानुसार मीनाकुमारीने नेहरूंच्या स्मारक पुतळ्याला मदत म्हणून मोठी रक्कम दिली होती. तेव्हा वेगवेगळ्या स्मारकांचा विषय निघत गेला. त्यावेळी त्या बहुधा शिवपुरीहून नुकत्याच परतत होत्या. तेथील महाराजा माधवराव शिंदे यांचा मुलगा जीवाजीराव शिंदे यांनी आपल्या आईचं स्मारक म्हणून छत्री उभारलेली आहे. त्यासंबंधात मीनाकुमारी म्हणाली, अपनी प्रेमिका के लिए आस्मान से तारे तोड लाने का वादा तो एक भिखमंगा भी कर देता है । क्या हुवा जो एक शहनशाहने अपने प्रेमिका को ताजमहल की सौगात दे दी ? ऐसे कई ताजमहल इन छत्रीओं पर न्योछावर है, जिन्हे लायक बेटोंने अपने माता पिताकी पुण्यस्मृती में बनाया है…असं ती बरंच काही बोलत राहिली.

मीनाकुमारीच्या आवाजात तिचं मातृहृदय भरून आलेलं जाणवत होतं. माणसं जातात, पण मनात घर करून राहतात हे खरंच.