नाटक – ‘रविवार डायरीज्’, अभिवाचनाची अभिजातता!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> क्षितिज झारापकर

नाटकाचे अभिवाचन, एक अभिनव प्रयोग.
‘रविवार डायरीज्’ हे नाटक सध्या अभिवाचनातून सादर केले जात आहे.

मराठी नाटकांचं विश्व गेल्या काही वर्षांत प्रंचंड विस्तारीत झालं आहे. नाटय़कलेचे प्रयोगाव्यतिरिक्त आणखीन बरेच प्रकार आता रंगभूमीच्या मुख्य धारेत येऊ लागले आहेत. सुमीत राघवन सध्या एक व्यावसायिक नाटक करतो जे एकपात्री आहे आणि लिखाण नाटकासारखं नसून लेखा सारखं आहे. पण प्रायोगिक स्थरावर ते अप्रतीम झालं आहे. ‘बाई, बाटली आणि अमीबा’ या नाटकाचा पहिला अंक हा अभिनययुक्त नाटय़वाचन आहे. नाटकाचं अभिवाचन हा एक सध्या खूप लोकप्रिय होत चाललेला प्रकार आहे. ठिकठिकाणी असे अभिवाचनाचे खूप डिसिप्लीन्ड कार्यक्रम होताना दिसतात.

नाटकाचं अभिवाचन ही व. पू. काळे, पु. ल. देशपांडे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांनी आपल्या लिखाणाला जे एक्सटेन्शन केलं तशी बाब आहे. या सगळ्या दिग्गज लेखकांचं साहित्य खूप लोकप्रिय तर होतंच पण ते त्यांनी कथाकथनाच्या कार्यक्रमातून सादर करायला सुरुवात केली आणि एक वेगळीचं पातळी गाठली गेली. कारण आता लिखाण जसं लेखकाला अभिप्रेत होतं नेमकं तसंच ते वाचकांपर्यंत पोहोचू लागलं होतं. पुस्तक वाचताना वाचक आपल्या पध्दतीने वाक्य आणि शब्दांचे जोर आणि मोडतोड करत वाचतो. पण कथाकथनात लेखक त्याला किंवा तिला अभिप्रेत इम्पॅक्टनिशी तो कन्टेन्ट रसिकांपर्यंत पोहोचवू शकतो. ही आयडिया खरंतर कवी संमेलनातून गद्य लेखकांनी उसनी घेतली आणि आता ती नाटककार वापरु लागले आहेत.

मुळात एखादं नाटक जन्म घेतं तेव्हा नाटककार नाटक लिहून झाल्यावर दिग्दर्शक, निर्माते आणि प्रमुख नटांच्या समक्ष त्याचं वाचन करतात. तेव्हा नाटक हे दिग्दर्शकाला अभिप्रेत स्वरुपात असतं. मग त्यावर दिग्दर्शक आणि नटाचे संस्कार होतात आणि प्रयोग स्वरुपात ते आपण प्रेक्षक पहातो. पण अभिवाचनात नाटककाराने लिहीलेल्या नाटकावर दिग्दर्शक वाचिक अभिनयाचे संस्कार करुन ते नटांच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतो. यात नेपथ्य, संगीत, रंगभूषा, वेशभूषा किंवा प्रकाशयोजनेचे सोपस्कार नसतात. त्यामुळे नाटकाचा गाभा आपल्यापर्यंत अनअडल्टरेटेड – निर्भेळ स्वरुपात पोहोचु शकतो. असाच एक प्रयत्न दादरच्या अमर हिंद मंडळ या संस्थेने सध्या राबवला आहे. नुकतंच तिथे चैतन्य सरदेशपांडे या तरुण नाटककाराने आपले ‘रविवार डायरीज्’ हे नवीन नाटक अभिवाचन स्वरुपात सादर केलं.

चैतन्य हा अत्यंत संवेदनशील लेखक आहे. त्याने याआधी ‘मुंबई – तुंबई’ हे मुंबईच्या वाढत्या गर्दीवरचं नाटक लिहिलंय जे प्रायोगिक स्तरावर गाजलं आहे. चैतन्य हा एक उत्तम अभिनेता आहे. त्याने स्वतः लिहिलेल्या ‘माकड’ या व्यावसायिक नाटकात प्रमुख भूमिकाही केलेली आहे. त्यामुळे त्याच्या ं‘रविवार डायरीज्’च्या अभिवाचन स्वरूपातील नवीन नाटकाबाबत उत्सुकता खुप जास्त होती. ‘रविवार डायरीज्’ हे नाटक कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या बाबतीतलं नाटक आहे. सर्वसामान्य माणूस स्वप्न घेऊन जगतो. तो स्वप्न पाहात नाही तर स्वप्न शोधतो. कारण स्वप्न पाहाणं ही चैन त्याला परवडतंच नाही. आयुष्याच्या रामरगाडय़ातल्या जबाबदाऱया, विवंचना यात तो इतका गुरफटलेला असतो की त्याला त्याची स्वप्न फक्त मनात बाळगायला परवानगी असते. ती सत्यात उतरवायची मुभा त्याला त्याच्या आजूबाजूची माणसं देतंच नाहीत. ही एका साधारण माणसाची व्यथा चैतन्य सरदेशपांडे याने ‘रविवार डायरीज्’मध्ये मांडलेली आहे.

विषय मांडायला नाटककार स्थळ काय निवडतो हे अत्यंत महत्वाचं असतं कारण त्यातून नाटकाचा विषय अधोरेखित होतो. इथे एका मॉलमधलं रेडीमेड कपडय़ाचं दुकान आहे. आजच्या एक्स्ट्रीम बाजारीकरणाचं प्रतीक म्हणून ते अत्यंत सुसंगत आहे. या मॉलमध्ये साने नावाचे एक गृहस्थ आपल्या बायको सोबत शर्ट घ्यायला येतात आणि तो स्वप्नरुपी शर्ट त्यांना सापडतोही, पण त्यावरच्या एकावर एक फ्री या स्कीममध्ये ते अडकतात आणि अधिकच्या स्वप्नाच्या शोधात हरवतात असा साधारण घाट ‘रविवार डायरीज्’चा आहे.

चैतन्यने स्वतः साने आणि मॉलमधले काही इतर गिऱहाइकं या व्यक्तिरेखा अत्यंत खूबीने सादर केल्या. विषेशतः साने हे पात्र नाटक सूत्रधारासारखं थेट प्रेक्षकांशी बोलणारं आहे. चैतन्यने सानेच्या विविध छटा खूप छान उभ्या केल्या. निशांत जाधव ह्या कलाकाराने दुकानाच्या काउंटरवरचा माणूस आणि अन्य गिऱहाइकं प्रभावीपणे मांडली. निशांतने वेगवेगळ्य़ा पात्रांच्या भाषेतले बदल खूप छान पध्दतीने अंगीकृत करत त्यांच्यातील वेगळेपण केवळ संवादातून दाखवलं. हे निश्चित कौतुकास्पद आहे. पूजा कातुर्डे ही नव्या दमाची अभिनेत्री या अभिवाचनात सहभागी होती. ‘रविवार डायरीज्’मधल्या सगळ्या स्त्र्ााr भूमिका अर्थातच पूजाच्या वाटय़ाला आल्या होत्या. पूजाने त्या प्रत्येक भूमिकेतील नाटय़ कमालीच्या सहजतेने सादर केलं. वेगवेगळ्य़ा पात्रांच्या भावना उभ्या करताना पूजाने योजून पॉजेस् घेतले आणि नाटय़ानुभव अधिक ताशीव केला. हे चैतन्यने आधी वाचनाची तालीम करुन ठरवलं की पूजाने स्वतः केलं हे महत्वाचं नसून ‘रविवार डायरीज्’चा एकंदर अनुभव अधिक परिणामकारक झाला हे निश्चित.

अमर हिंद मंडळाने यंदा अशा 10 नाटकांच्या अभिवाचनाचा घाट पुढचा महिनाभर घातलेला आहे. या उपक्रमाबद्दल मंडळाचं अभिनंदन

नाटक  – रविवार डायरीज्

पुढाकार  – अमर हिंद मंडळ

लेखक, वाचक – चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे निशांत जाधव

दर्जा  – ***