
तोंडी ट्रिपल तलाकची जिल्हय़ातील पहिली घटना
गुन्हा दाखल
केंद्र सरकारने ‘ट्रिपल तलाक’वर बंदी घातली असली तरी म्हसळा येथील एका मुस्लिम युवकाने आपल्या पत्नीला तलाक.. तलाक.. तलाक असे तीन वेळा बोलून तोंडी ‘तलाक’ दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साजीद इनामदार असे ट्रिपल तलाक देणाऱ्या नवरोबाचे नाव असून पत्नी व दोन लहान मुलांना वाऱ्यावर सोडून त्याने आपल्या प्रेयसीबरोबर मुंबईत गुपचूप विवाह केला. ‘ट्रिपल तलाक’च्या बंदीनंतरची रायगड जिह्यातील ही पहिलीच घटना असून साजीदविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसळा शहरातील साजीद इनामदार या तरुणाने 25 ऑक्टोबर 2013 रोजी शरीफा शेख (26) या तरुणीशी लग्न केले होते. म्हसळा शहरात राहण्याऱया साजीद इनामदार याचा दुबईत व्यवसाय असून तो म्हसळ्यामध्ये ये-जा करत असे. त्यावेळी त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. प्रेमसंबंध जुळलेल्या या तरुणीसोबत लग्न करण्यासाठी इनामदार याने 31 ऑक्टोबर रोजी आपल्या पहिल्या पत्नीला तोंडी तलाक दिला. साजीद इनामदार व मुसा या चिमुकल्या मुलांनाही वाऱयावर सोडले.
पत्नीला सोडून प्रेयसीशी केला विवाह
साजीद याने पहिल्या पत्नीस सोडून प्रेयसीबरोबर रविवारी निकाह केला. तीन वेळा तलाक बोलून लग्न मोडण्याच्या प्रथेला केंद्र सरकारने मनाई केलेली असताना साजीद याने कायद्याचा भंग केला. याबाबत पीडित शरीफा (26) हिने म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून साजीद इनामदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कठोर शिक्षा करा!
शरीफा इनामदार हिच्यासोबत साजीद याचे पहिले लग्न झाले होते याचा त्याला विसर झाला आहे. एका मुलीचे आयुष्य वेशीवर टांगणाऱया इनामदार याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रियाज घराडे यांनी केली आहे.


































































