रिझर्व्ह बँकेला महागाईचे टेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल, डिझेल, गॅसपासून भाज्यांपर्यंत सर्वच वस्तूंची प्रचंड दरवाढ होत असल्याने देशात महागाईने कहर माजविला आहे. जनता त्रस्त झाली असताना आता रिझर्व्ह बँकेलाही या महागाईचे टेन्शन आले आहे. याविषयी बोलताना गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईबाबत रिझर्व्ह बँक गंभीर आहे. आम्हाला 4 टक्क्यांचे उद्दिष्ट गाठावेच लागेल, असे वक्तव्य केले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला 6 ते 8 ऑक्टोबरदरम्यान चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक झाली. या बैठकीत धोरणात्मक दर कायम ठेवण्याच्या बाजूने गव्हर्नर शक्तिकांत दास  यांनी मतदान केले. बैठकीचा तपशील आता जाहीर झाला असून गव्हर्नर दास यांनी महागाईबाबत चिंता व्यक्त केल्याचे स्पष्ट होते. कन्झुमर प्राइज इंडेक्स (सीपीआय) महागाईचा दर चार टक्क्यांपर्यंत खाली आणण्यावर आमचा भर राहील, असे दास म्हणाले. जुलै आणि ऑगस्टमध्ये महागाई तुलनेने जास्त होती. सप्टेंबरमध्ये घट होऊन 4.35 टक्क्यांवर आली. मात्र महागाईचे उद्दिष्ट 4 टक्क्यांपर्यंत रिझर्व्ह बँकेला गाठावेच लागेल आणि हे आव्हान असणार आहे.

खरिपाचे उत्पादन चांगले, पण वाहतूक खर्च वाढणार

पुढील काळात जर आणखी अवकाळी पाऊस पडला नाही तर खरीप पिकांचे उत्पादन चांगले होईल. पुरेसा अन्नसाठा उपलब्ध झाल्याने अन्नधान्याच्या महागाईत घट राहील. पण इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढेल, अशी चिंताही गव्हर्नर दास यांनी व्यक्त केली.

दीड वर्षातच पेट्रोल 36 रुपयांनी तर डिझेल 26 रुपयांनी महागले

  • इंधन दरवाढीचे सत्र सुरूच असून शनिवारी पेट्रोल आणि डिझेल 35 पैसे प्रतिलिटर महागले आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह देशभरात अनेक शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 113 रुपयांवर तर डिझेल 104 रुपयांवर गेले आहे.
  • सततच्या दरवाढीमुळे अवघ्या 18 महिन्यांत पेट्रोल प्रतिलिटर तब्बल 36 रुपयांनी तर डिझेल 26.58 रुपयांनी महाग झाले.
  • इंधन दरवाढीमुळे वाहतूक महागली आणि भाजी, फळांसह अनेक वस्तूंचे भाव कडाडले आहेत.