
देशातील बनावट नोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचा अहवाल रिझर्व्ह बँकेने दिल्यानंतर आता यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महागाई वाढली असून नोटाबंदीने नक्की काय साध्य झाले असा सवाल वळसे-पाटील यांनी उपस्थित केला.
नोटाबंदी करण्यात आली त्यावेळी देण्यात आलेल्या अनेक कारणांपैकी महागाई हे देखील एक कारण होते. परंतु आज महागाई वाढली असून नोटाबंदीने नक्की काय साध्या झाले? असा सवाल दिलीप वळसे-पाटील यांनी केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बनावट नोटांची संख्या वाढत असल्याचे म्हणत असेल तर केंद्राच्या धोरणामध्ये मोठी चूक झाल्याचे दिसतेय. त्यामुळे धोरण कुठे फसले यासंदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले.
500 आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटांमुळे अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण होणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा हा सपशेल पराभव आहे. केंद्राने या संदर्भात सखोल चौकशी करून हे नक्की कशामुळे घडले याची माहिती जनतेला द्यावी आणि पुढे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारन नक्की काय उपाययोजना आहेत याचीही माहिती द्यावी, असे आवाहन वळसे-पाटील यांनी केले.
बनवाट नोटा वाढल्या
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2022 पर्यंत बाजारात असलेल्या 500 आणि 2000 रुपयांचे नोटांचे प्रमाण 87.1 टक्के होते. त्यामध्ये 500 रुपयांचे प्रमाण सर्वाधिक 34.9 टक्के होते, त्यानंतर 10 रुपयांच्या नोटेचा नंबर लागत असून बाजारातील एकूण नोटांच्या तुलनेत 21.3 टक्के एवढे आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 10, 20, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण अनुक्रमे 16.4 टक्के, 16.5 टक्के, 11.7 टक्के, 101.9 टक्के, 54.6 टक्के एवढे वाढले आहे.

























































