
हिंदुस्थानात पॉलिमर म्हणजेच प्लॅस्टिकच्या नोटा चलनात येणार असल्याचे अखेर खरे ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर तर्कवितर्क लढवले जात होते, परंतु लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. आरबीआय जवळपास ३ हजार कोटी रुपये किमतीच्या प्लॅस्टिकच्या नोटा छापणार आहे. आरबीआय फील्ड ट्रायल अंतर्गत १० आणि २० रुपयांच्या प्रत्येकी १०० कोटी प्लॅस्टिकच्या नोटा जारी करणार असून, या नोटांची एकूण किंमत ३ हजार कोटी रुपये आहे.
आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारसीनंतर केंद्र सरकारकडे फील्ड ट्रायलसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. चाचणी यशस्वी झाल्यानंतर १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटा नियमितपणे चलनात आणण्याची परवानगी मागवण्यात आली होती. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सामान्य कागदी नोटांच्या तुलनेत प्लॅस्टिकच्या नोटा अधिक टिकाऊ मानल्या जातात. या नोटा पाण्यामुळे किंवा घामामुळे सहज खराब होत नाहीत, लवकर फाटत नाहीत, नोटांवर धूळ साचत नाही, नोटांचे आयुष्य अधिक असते, नोटांची गुणवत्ता टिकून राहते. १० आणि २० च्या नोटांच्या फील्ड ट्रायलची निवड झाल्याची ही पहिली अधिकृत माहिती आहे. याआधी १७ जुलैला आरबीआयच्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडने ३.४ कोटी पॉलिमर शीट्सच्या खरेदीसाठी जागतिक निविदा जारी केली होती.
पाच शहरांत पहिली चाचणी
देशातील विविध हवामान आणि भौगोलिक परिस्थितींमध्ये या नोटांचा टिकाऊपणा तपासण्यासाठी आरबीआयने पाच शहरांची निवड केली आहे. यामध्ये कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला, भुवनेश्वर या पाच शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये उष्ण, दमट, कोरडे आणि डोंगराळ अशा वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव मिळतो. या नोटांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा तपासला जाणार आहे.




























































