अजातशत्रू माणूस होता.

>>संतोष पवार (नाट्य अभिनेते )

प्रदीप पटवर्धन..  त्याची कधी कोणाबद्दल तक्रार नव्हती. कधी कोणाबद्दल राग नव्हता. कधी त्याने कोणाविषयी, कोणा बरोबर गॉसिप केलं नाही. वेळेचं पालन काटेकोर करायचा. नोकरी सांभाळून नाटकात काम करायचा, तरी त्याने कधी नाटकासाठी कधी ऑफिसला दांडी मारली नाही. नोकरी आणि नाटक यात कधी गल्लत केली नाही. मी कामावरून येतोय. मला प्रवासासाठी पैसे द्या, असे त्याने कधीही म्हटले नाही. नाटकासाठी गोव्याहून अप-डाऊन करायचा. नाटकाचा प्रयोग नसेल तेव्हा ऑफिसमध्ये असायचा.
त्याच्याकडे नृत्याचे कौशल्य होतं, तालाचं ज्ञान होतं, सुरांचीही जाण होती. विनोदही छान करायचा. भावनिक भूमिकाही अप्रतिम सादर करायचा. त्याला प्रत्येक नाटकात काम करावंसं वाटायचं. पैसे मिळवण्यासाठी त्याने कधीच नाटकात काम केलं नाही.तो एक चांगला कलाकार होता. त्यामुळे त्याच्या निधनाची बातमी ऐकून खूप धक्का बसला. तो कलाकार म्हणून कधी कुठल्या पार्टी दिसणार नाही. खोटं हसा, खोटं रडा, गुड मॉर्निंग असे मेसेज त्याने रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी कधी केले नाहीत; पण भेटला की मनापासून बोलायचा. सेलिब्रिटी , नवीन कलाकार असा भेद त्याने कधी केला नाही.

आम्ही त्याला खूप ज्युनियर होतो, पण तरीही आमच्याशी खुप छान बोलायचा. तू नवखा मला काय शिकवतो, असं त्याने कधीच केलं नाही. नवीन कलाकार त्याच्यासोबत एकदम इझी व्हायचे. त्याच्याबरोबर आम्ही ब-याच नाटकात काम केलं. इतकी वर्षे मी काम केलं असा गर्व त्याने कधीही बाळगला नाही. वेध वॉशिंग्टनचा, दिली सुपारी बायकोची आणि माझ्या पहिल्या नाटकात आम्ही एकत्र काम केलं. मला टाळ्या मिळायच्या. विनोदी कलाकार म्हणून यालाच टाळ्या मिळतात, असा विचारही त्याने कधी केला नाही.

कसलाही अॅटिट्युड नाही. सेलिब्रिटी म्हणून तो कधी वारीला नाही. कुणीही भेटले की भरपूर बोलणार, गिरगावच्या नाक्यावर उभा राहणार. काही कलाकार आपली किंमत वाढावी म्हणून लोकांना दिसत नाहीत. तसं याचं नव्हतं. बिनधास्त राहणं त्याला आवडायचं.परवाच एका कार्यक्रमात परीक्षक म्हणून आला होता. भेटल्यावर छान गप्पा मारल्या. ठाण्यात प्रयोग बघायला आला होता. तेव्हा त्याला म्हटलं , नाटक बघायला ठाण्यात? यावर म्हणाला, नाटक आहे संतोष. बघायचं म्हणजे बघायचं!

स्वार्थी नट नव्हता…
सगळ्या नाटकात काम करायचा. तो स्वार्थी नट नव्हता. माझा रोल कसा आहे? मला फुटेल आहे का? नाटकाचा शेवट माझ्यावर आहे का? संस्था ना नावाजलेली आहे का? माझ्याबरोबर काम कोण करतंय? याची पर्वा न करता तो फक्त नाटक करायचा. त्याचं नाटकावर प्रचंड प्रेम होतं. नाटकाचे प्रयोग बुडवून तो कशाच्याही आहारी गेला नाही. आज एक छान comment आलीय. आज प्रदीप गेला ते पण Bank Holiday च्या दिवशी. त्याने कधीही नाटकासाठी सुट्टी टाकली नाही. त्याच्याकरिताही कोणाला सुट्टी घ्यावी लागली नाही.त्याच्या पुण्याच्या घरी मी जाऊन आलो. त्या घराची गॅलरी 1000 स्क्वेअर फिट आहे. तरीही तो गिरगावातल्या चाळीत राहायचा. त्या माणसांचं त्याला फार वेड होतं. स्वतःची गाडी असूनही ट्रेनने प्रवास करायचा. परवा ठाण्याला नाटक बघण्यासाठी ट्रेनने आला होता. त्याच्या चालकाला स्वतःच्या गाडीने घरी सोडायचा.