बाप्पाचा खाऊ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मीना आंबेरकर

गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे केवळ आनंदोत्सव, आनंद सोहळा. त्याचे स्वागत करण्यासाठी आबालवृद्ध सर्वच उत्सुक असतात. त्याच्या आगमनाची तयारी महिनाभर आधी सुरू होते. कामं वाटली की, जो तो शर्थीने आपले काम पूर्ण करण्यासाठी कार्यरत होतो. गृहिणी आपल्या पाककौशल्याला नव्याने उजाळा देत कामाला लागते. गणपतीच्या नैवेद्यासाठी कोणकोणते पदार्थ करायचे याचे नियोजन होते. त्या त्या पाककृतींसाठी लागणारी सर्व तयारी चोख केली जाते. गणेश चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य हवाच. त्याची तयारी सर्वात महत्त्वाची. तसेच नैवेद्याच्या पानात आणखी अनेक तिखट-गोड पदार्थांचा समावेश असतो. त्या सर्वांची तयारीही आवश्यक असतेच. प्रथम आपण बघूया पारंपरिक उकडीच्या मोदकाची पाककृती.

उकडीचे मोदक

modak-kadai

सारणासाठी साहित्य – एका नारळाचं पांढरंशुभ्र खोबरं, अर्धी वाटी किसलेला गूळ, पाव वाटी दूध, दोन चमचे साखर, अर्धा चमचा वेलचीपूड, पाव चमचा तीळ.

पारीसाठी साहित्य – एक वाटी बासमती अथवा आंबेमोहर तांदळाची पिठी, एक वाटी पाणी, एक चमचा तूप किंवा लोणी, पाव चमचा मीठ.

सारणाची कृती – खोबरे दूध घालून शिजवायला ठेवावं. जरा नरम झाल्यावर गूळ व साखर घालून कोरडं होईस्तो मंदाग्नीवर परतावं. गार झाल्यावर त्यात वेलचीपूड घालावी.

पारीची कृती – एक वाटी पाणी उकळत ठेवावं. उकळी फुटली की, त्यात पाव चमचा मीठ आणि एक चमचा तूप किंवा लोणी आणि दोन चमचे दूध घाला व व्यवस्थित उकळलं की, त्यात एक वाटी तांदूळ पीठ घालून ढवळून वर झाकण ठेवावं. गॅस बंद करावा. पाच मिनिटांनी पीठ गरम असतानाच परातीत काढून तुपाच्या हाताने मऊसर मळावं. यालाच उकड म्हणतात. उकडीचा एक गोळा घेऊन बोटांनी दाबून त्याची वाटी करावी. वाटीत दोन चमचे सारण घालून मुखऱया घेऊन मोदक करावा. मोदकपात्रात जाळीवर एक ओला उडका अथवा केळीचं पान घालून मोदक पाण्यात बुडवून मांडावेत. वर झाकण ठेवून एक वाफ आणावी. वाफवण्यापूर्वी पाण्यात बुडवून घेतल्यानं मोदक फुटण्याची भीती कमी असते. साजूक तुपाबरोबर खायला द्यावेत.

आंब्याच्या रसातले मोदक

keshari-modak

साहित्य – तांदळाची पिठी, मीठ, वनस्पती तूप, नारळ, साखर, आंब्याचा रस, बेदाणे.

कृती – दोन वाटय़ा आंब्याचा रस स्टीलच्या चाळणीवर गाळावा. त्यात दोन वाटय़ा नारळाचे खोबरे, अडीच वाटय़ा साखर घालावी. कल्हईच्या पातेल्यात तुपाचा हात लावून त्यात मिश्रण घालावे व मंद गॅसवर ठेवावे. सतत ढवळत राहावे. घट्टसर झाल्यावर खाली उतरावे. त्यात वेलचीपूड, काजूचे काप, बेदाणे व केशर घालावे. गार होईपर्यंत अधूनमधून ढवळावे. दोन वाटय़ा पाणी व एक वाटी आंब्याचा गाळलेला रस एकत्र करून त्याला उकळी आणावी. त्यात पाव वाटी वनस्पती तूप व थोडे चवीसाठी मीठ घालावे. नंतर तीन वाटय़ा तांदळाची पिठी घालून उकड काढावी व वरीलप्रमाणे मोदक करावेत. हे मोदक आकर्षक दिसतात आणि आंबटगोड, मधूर लागतात.

रवा-नारळ लाडू

ladoo

साहित्य- एक वाटी बारीक रवा, एक वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी साजूक तूप, तीन चमचे वेलचीपूड, अर्धी वाटी साखर, पाव वाटी पाणी अथवा दूध.

कृती – पाव वाटी तुपात रवा मंद गॅसवर खरपूस भाजावा. भाजत आला की, त्यात खोबरं घालून मंदाग्नीवर परत खमंग भाजावं. व्यवस्थित भाजलं गेल्यानंतर मिश्रण हलकं लागतं. मिश्रण बाजूला ठेवावं. साखर भिजेल एवढं पाणी किंवा दूध घालून एकतारी पाक करावा. त्यात भाजलेला रवा, खोबरं, वेलचीपूड घालून व्यवस्थित मिसळा व गॅस बंद करावा. उरलेल्या दुधाचा हबका या मिश्रणावर मारून कमीत कमी अर्धा तास गार व्हायला ठेवा व पूर्ण गार झाल्यानंतर पुन्हा एकदा मिसळून घेऊन आवडीप्रमाणे लाडू वळावेत. या लाडवात आवडत असल्यास थोडा खवा घालावा.

ओल्या नारळाच्या करंज्या

dry-fruit-karanji
सारणासाठी – चार वाटय़ा किसलेलं ओलं खोबरं, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी गूळ, एक वाटी दूध, 1 चमचा वेलचीपूड.

पारीसाठी साहित्य – 1 वाटी चाळलेला रवा, पाव वाटी बारीक रवा, चार चमचे पाणी, पाव वाटी तूप, अर्धा चमचा मीठ, तळण्यासाठी तेल, पाव चमचा साखर.

सारण – चार वाटय़ा खोबरं एक वाटी दूध घालून गॅसवर ठेवावं. मंदाग्नीवर खोबरं नरम झालं की, त्यात प्रत्येकी अर्धी वाटी साखर आणि किसलेला गूळ घालावा. कोरडं होईस्तोवर ढवळत राहावं व्यवस्थित कोरडं झाल्यावर एक चमचा वेलचीपूड मिसळून गार व्हायला ठेवावं.

पारी – बारीक रवा चार चमचे पाणी घालून थोडा वेळ भिजवून ठेवावा. ओला रवा, मैदा, मीठ, साखर आणि पाव वाटी तूप हे सर्व साहित्य एकत्र मिसळून घेऊन बेताचं पाणी घालून घट्ट भिजवावं. मिक्सरमधून काढावं किंवा व्यवस्थित तिंबून घ्यावं. पीठ चांगलं नरम झालं की, त्याचे सुपारीएवढे छोटे गोळे करावेत आणि पुरीप्रमाणे छोटी पारी लाटावी. या पारीत आधी तयार केलेलं सारण व्यवस्थित भरून करंजी वळावी. तेल चांगलं तापवून मंदाग्नीवर सोनेरी होईतो तळून घ्याव्यात. कुरकुरीत होतात.