गणेशोत्सवासाठी काही खास रेसिपी

3499

>> विष्णू मनोहर

ऋषीची भाजी
साहित्य – पाऊण ते एक कप भेंडीचे तुकडे (1 इंच), 4 अळूची मध्यम पाने , 1/2 कप पडवळाच्या चकत्या, 200 ग्रॅम लाल भोपळ्याच्या फोडी , 1/4 कप मटारचे दाणे, 1/4 कप पापडी दाणे, 1/4 कप मक्याचे दाणे, 5-6 बेबी कॉर्न, (1 इंचाचे तुकडे करावे), 2 टेस्पून शेंगदाणे (3 तास भिजवलेले), 2 टीस्पून चिंच (कोळ करून घ्यावा), 1 हिरवी मिरची, 1/2 कप ताजा खवलेला नारळ, 1 टीस्पून तूप, 1/4 टीस्पून जिरे, चवीपुरते मीठ.

कृती – अळूची पाने धुऊन त्याचे देठ कापून घ्यावे. देठ सोलून पाने वेगळी ठेवावीत. त्याचे बारीक तुकडे करावेत. पाने बारीक चिरून घ्यावीत. कूकरमध्ये अळू (फक्त पाने) 1 शिट्टी करून शिजवून घ्यावा. अळूची शिजवलेली पाने मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. वाटताना मिरचीही घालावी. कूकर गरम करावा व त्यात तूप-जिऱयाची फोडणी करावी. त्यामध्ये सर्व भाज्या अळूच्या देठांसह फोडणीस घालाव्यात. थोडा वेळ परतून वाटलेली अळूची पाने घालावीत. चिंचेचा कोळ घालावा. चवीपुरते मीठ आणि भाज्या शिजण्यापुरते पाणी घालावे. कूकरचे झाकण बंद करावे आणि मध्यम आचेवर साधारण 15 मिनीटे भाजी शिजू द्यावी. 15 मिनिटांनी गस बंद करावा. वाफ मुरली की कूकरचे झाकण उघडावे आणि ओला नारळ घालून मिक्स करावे. एक उकळी काढावी. गरमा गरम भाजी, पोळी किंवा दशमीबरोबर सर्व्ह करावी. ही भाजी नुसती खायलाही चविष्ट लागते.

उकडीचे मोदक
साहित्य – 1 मोठा नारळ, किसलेला गूळ, 2 कप तांदूळाचे पीठ, केलचीपूड, मीठ, तांदळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप.

कृती – सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्यावा. पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहावे. गूळ वितळला की वेलचीपूड घालावी. ढवळून बाजूला ठेवून द्यावे. आवरणासाठी तांदळाची उकड करण्यासाठी नेहमी जितके पीठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. जाड पातेल्यात 2 कप पाणी उकळवत ठेवावे. त्यात 1 चमचा तेल किंवा तूप घालावे. चवीसाठी थोडे मीठ घालावे. परातीत तयार उकड काढून घ्यावी. उकड मळताना तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्यावी. उकड व्यवस्थित मळून झाली की त्याचे सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करून त्याची पारी तयार करावी. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या कराव्यात आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करावा.मोदकपात्रात पाणी उकळत ठेवावे .त्यातील चाळणीत स्वच्छ धुतलेले सुती कापड ठेवून त्यावर मोदक ठेवावेत. वरून झाकण लावून 10-12 मिनिटे वाफ काढावी. एकावर एक मोदक ठेवू नयेत. त्यामुळे मोदक फुटण्याचा संभव असतो. गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवून साजूक तूप घालून गरमागरम मोदक खावेत.

पंचामृत
साहित्य – 1/4 कप चिंच, 1/2 कप सुक्या खोबऱयाचे पातळ काप, 1/4 कप भाजलेल्या तिळाचे कूट, 1/4 कप भाजलेले शेंगदाणे, 7-8 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1/4 कप मनुका, बेदाणे, काजू, 2-3 टीस्पून किसलेला गूळ, 2-3 टीस्पून गोडा मसाला (काळा मसाला), 2 टिस्पून तेल, चिमूटभर हिंग, 1/2 टीस्पून हळद.

कृती – चिंचेचा घट्ट कोळ करून घ्यावा (साधारण एक काटी). पातेल्यात तेल तापवाके. त्यात हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी कराकी. त्यात खोबऱयाचे काप परतून घ्यावे. चिंचेचा कोळ घालावा. एक उकळी आल्यावर त्यात गोडा मसाला, शेंगदाणे, बेदाणे, मनुका, काजू घालावे. थोडे पाणी घालावे. तिळाचा कूट घालावा. गूळ घालून थोडे आटवावे.

 

आपली प्रतिक्रिया द्या