राज्यात साखरेचे 107 लाख मेट्रिक टन उत्पादन

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही यंदा साखरेचे रेकॉर्डब्रेक उत्पादन झाले आहे. सध्या ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत 952 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करत 1 कोटी 7 लाख 20 हजार मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे. आतापर्यंतचे हे सर्वाधिक उत्पादन ठरले आहे.

नोव्हेंबरमध्ये ऊस गाळप हंगाम सुरू झाला तेव्हा 102 सहकारी तर 93 खासगी कारखाने सुरू झाले होते. राज्यात दुष्काळी परस्थिती असल्याने उपलब्ध ऊस चारा छावण्यांना गेल्यास साखरेचे उत्पादन घटेल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाने बांधला होता. तसेच ऊस किती दिवस पुरणार अशी चिंता कारखान्यांना सतावत होती, मात्र हे अंदाज फोल ठरले असून राज्यात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे.

कोल्हापूर विभागात सर्वाधिक उत्पादन
साखरेचे सर्वाधिक उत्पादन कोल्हापूर-सांगली विभागातून 26 लाख 71 हजार मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. त्यानंतर पुणे-सातारा विभागातून 23 लाख 85 हजार मेट्रिक टन, सोलापूर विभागातून 21 लाख मेट्रिक टन एवढे झाले आहे. तर अमरावती विभागात सर्वात कमी 34 हजार मेट्रिक टन उत्पादन झाले आहे.