कोरोनावर मात करत गाठलं एव्हरेस्ट;गिर्यारोहक नीरज चौधरींच्या जिद्दीला सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी नीरज चौधरी काठमांडू येथून माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी सज्ज झाले होते. त्याच वेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना मोहीम सोडून घरी परतावे लागले. पण हार मानेल तो गिर्यारोहक कसला. त्यांनी कोरोनावर जिद्दीने मात दिली आणि सात आठवडय़ांच्या आत माऊंट एव्हरेस्ट सर केले. चौधरी यांच्या चिकाटीचे आज सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवारी आयआयटी दिलीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

37 वर्षांचे नीरज चौधरी यांना 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जयपूर येथील घरी परतावे लागले. त्यांना फक्त थकवा जाणवत होता. अन्य कोणतीही लक्षणं नव्हती. त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. चौधरी सांगतात, मी कोविडचा विचार केला नाही. एव्हरेस्ट मोहिमेचा पल्ला गाठायला मी किती परिश्रम घेतले, त्याचा विचार केला. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे हीच संधी आहे. कदाचित दुसरी संधी लवकर मिळणार नाही. म्हणून मी माझ्या मनाला आणि शरीराला समजावत होतो. उपचारानंतर मी पुन्हा एप्रिलमध्ये काठमांडूला परतलो. 31 मार्च रोजी एव्हरेस्ट शिखर सर केले.

नीरज चौधरी यांनी 2009—11 दरम्यान आयआयआटी दिल्ली येथून पर्यावरण विज्ञान आणि व्यवस्थापन या विषयात एमटेकची डिग्री मिळवली आहे. सध्या ते राजस्थानच्या जलसंसाधन विभागात कार्यरत आहेत. 2014 साली त्यांनी गिर्यारोहण सुरू केले. 2020 साली इंडियन माउंटेनिरयरिंग फाउंडेशन एव्हरेस्ट एक्सपिडिशनचे सदस्य म्हणून निवड झाली. शुक्रवारी आयआयटी दिल्लीच्या वतीने समारंभात नीरज चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. चौधरी यांनी आयआयटी दिल्लीचे आभार मानले. गिर्यारोहण मोहिमेसाठी 24 लाख रुपयांचा निधी जमा करणाऱया सर्वांचे त्यांनी आभार मानले.