टाकाऊ प्लॅस्टिकपासून नागोठण्यात टिकाऊ रस्ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्लॅस्टिकच्या भस्मासुराचे करायचे काय, असा प्रश्न  सर्वांनाच पडत असताना नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने यापासून  तब्बल 40 किलोमीटरचे मजबूत रस्ते तयार केले आहेत. टाकाऊ 50 टन प्लॅस्टिकचा वापर करून अवघ्या दोन महिन्यांत मजबूत रस्ता तयार झाल्याने हजारो वाहनचालकांसह प्रवाशांची खड्डय़ांच्या कटकटीतून सुटका  झाली आहे.

टाकाऊ प्लॅस्टिकपासून रस्ता तयार करण्यासाठी रिलायन्सच्या नागोठणे येथील प्रकल्पामध्ये  विविध प्रयोग केल्यानंतर मे 2019 मध्ये टाकाऊ प्लॅस्टिकचा रस्ता बनविण्यास सुरुवात करण्यात आली. दोन महिन्यांमध्ये सुमारे 40 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या मिश्रणामध्ये दहा टक्के प्लॅस्टिकचा वापर करण्यात आला आहे. रस्ता तयार करण्याच्या मिश्रणात पूर्णपणे टाकाऊ  प्लॅस्टिकचा वापर केल्यामुळे खर्च एका कि.मी. मागे एक लाख रुपयांनी कमी झाला आहे, असे रिलायन्स पेट्रोकेमिकलचे सीईओ विपुल शाह यांनी सांगितले.

400 कोटी बाटल्या जमा करणार

पाणी आणि शीतपेयांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर पुन्हा प्रक्रिया करून त्यापासून फायबर वेगळे करता येते. त्यामुळे रिलायन्स समूहाने संपूर्ण देशभरातून प्रत्येक वर्षाला 200 कोटी बाटल्या जमा केल्या आहेत. यंदाच्या वर्षापासून 400 कोटी बाटल्या जमा करण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यासाठी 21 कलेक्शन सेंटर तयार केले आहेत.

  • डांबर आणि खडीमध्ये मिक्स टाकाऊ प्लॅस्टिकचे छोटय़ा मशीनमध्ये छोटे तुकडे केले जातात. हे तुकडे खडी आणि डांबरामध्ये मिसळतात. त्यानंतर या मिश्रणाला 120 डिग्री सेल्सिअस तापमान दिले जाते. ही उष्णता कमी असल्यामुळे प्लॅस्टिकमधून कोणतेही धोकादायक वायू बाहेर पडत नाहीत.
  • डांबर आणि खडीच्या रस्त्यात पाणी जिरत असल्याने हे रस्ते पावसाळ्यात फक्त खराब होतात. मात्र त्यामध्ये प्लॅस्टिक मिक्स केले तर रस्त्यामध्ये पाणी जिरत नाही. त्यामुळे रिलायन्सने तयार केलेला रस्ता मजबूत झाला आहे, अशी माहितीही विपुल शाह यांनी दिली.