
>> राजेश चुरी
रिफायनरी प्रकल्प 100 टक्के कोकणातच होणार आणि महिनाभरात जागेची घोषणा करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी गुरुवारी रात्री निवडक पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील निवडणुका, प्रचाराच्या काळातील आरोप-प्रत्यारोप, युतीला मिळणाऱ्या जागा, निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांची सुरू असलेली ‘ईडी’ची चौकशी अशा वेगवेगळ्या विषयांवर मते मांडली.
पराभव समोर दिसू लागल्याने…
बार्शी येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विशिष्ट हातवारे केले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, समोर दिसत असलेला पराभव आपली सदसद्विवेकबुद्धी कमी करतो. त्यामुळेच त्यांच्याकडून असे हातवारे झाले. पण अशा वेळेस आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवायची असते असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मारला.
पवार पॅटर्न चालणार नाही
विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांचे राजकीय अस्तित्व संपेल का असा प्रश्न केला असता असे अस्तित्व संपत नाही पण सत्तेचा उपयोग करून सत्ता आणायची, सत्तेसाठी काहीही करायचे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात भ्रष्ट संस्कृती तयार झाली होती. हा शरद पवारांचा गेल्या अनेक वर्षांचा पॅटर्न आता लोकांना पसंत पडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.
चौकशीत सर्व बाहेर येईल
महाराष्ट्र स्टेट को-आपरेटिव्ह बँकेतील कथित गैरव्यवहार व ईडीच्या चौकशीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. यातील तेरा पानी तक्रारीत शरद पवार यांच्यासहीत सर्वांची नावे लिहिली आहेत. त्यांची भूमिका लिहिली आहे. पण यात घोटाळा तर झालाच आहे. कारण सुस्थितीत असलेले साखर कारखाने हे काही कारणाने तोटय़ात गेल्याचे लक्षात येते. कारखाने तोटय़ात गेल्यावर विक्रीसाठी काढले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून काही लोकांनी कवडीमोल भावाने टेंडर भरून कारखाने मिळवले. नंतर सरकारचा उपयोग करून सरकारची देणी रद्द करून घेतली. त्यामुळे हा एक गैरप्रकारच आहे. त्याचा थेट संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांशी आहे.
ते शरद पवार यांच्याशी संबंधित लोक आहेत. यामध्ये अवैध कर्जवाटप व इतर काही गोष्टी पुढे आल्या आहेत. आपण बँकेवर कधीही नव्हतो असे शरद पवार जरी सांगत असले तरी त्यांच्या चेल्यांनी कर्जवाटप करताना केंद्रीय मंत्री पवार साहेबांच्या निर्देशाप्रमाणे, पवारसाहेबांच्या पत्राप्रमाणे असे ठरावात नमूद करून ठेवले आहे अशी माहिती मला मिळाली आहे. त्यामुळे असे पत्र लिहिले असेल तर त्यांचे पत्र व ठरावही चौकशीत पुढे येईलच असे मुख्यमंत्री म्हणाले.
जिथे मागणी, तिथेच रिफायनरी
नाणार प्रकल्पाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, रिफायनरी 100 टक्के होणार आणि कोकणातच रिफायनरी करणार. पण ज्या ठिकाणी लोकांचे बहुमत आहे, लोकांची प्रकल्पासाठी मागणी आहे त्याच ठिकाणी रिफायनरी करणार. त्याची घोषणा महिनाभरात मी करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मी महाराष्ट्रातच
महाराष्ट्रातून दिल्लीला जाण्याच्या संदर्भातील चर्चेला त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. मी आता मुख्यमंत्री आहे. मला ज्या क्षणी माझा पक्ष सांगेल की तुम्हाला दिल्लीत जायचे आहे त्याक्षणी दिल्लीत जाईन. उद्या पक्षाने सांगितले घरी बस तर घरी बसेन. पण आता जेवढे राजकारण मला समजते त्यानुसार माझी महाराष्ट्रात आवश्यकता आहे. पक्षालाही असे वाटते की, मी महाराष्ट्रातच राहिले पाहिजे. त्यामुळे मी महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे असे ठामपणे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधकांची संख्या कमी होईल
विधानसभा निवडणुकीतच्या निकालानंतर दोनतृतीयांश बहुमताच्या पुढे जाऊ. विरोधी पक्ष समोर असेल अथवा नसेल हे जनताच ठरवेल. पण महायुतीच्या आमदारांची संख्या अभूतपूर्व असेल आणि विरोधकांची संख्या अभूतपूर्व कमी झालेली असेल असे भाकीत मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केले.

























































