कराड जनता बँकेच्या ठेवीदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु

कराड जनता सहकारी बँक 7 डिसेंबर 2021 रोजी अवसायनात निघाली होती. ठेव हमी पतविमा महामंडळाने विहीत नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह क्लेमफॉर्म सादर केलेल्या ठेवीदारांना त्यांच्या 5 लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा क्लेम रक्कम मंजूर केली आहे. पहिल्या टप्यात 39 हजार 32 ठेवीदारांना 329 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. ही रक्कम ठेवीदारांच्या अन्य बँकेतील खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया 5 मेपासून सुरु होत असल्याची माहिती बँकेचे अवसायक तथा कराडचे उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली आहे.

ठेवीदारांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली असली तरी मंजूर रक्कम ठेवीदारांना त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बँकेला ठेव हमी पतविमा महामंडळाने किमान तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. कोविड परस्थितीमुळे कालावधी वाढूही शकतो. यामुळे ठेवीदारांनी कोणत्याही प्रकारे घाई-गडबड करण्याची गरज नाही. शाखेत बोलवणे आल्यानंतर आधारकार्ड व पॅनकार्ड सोबत घेऊन ठेव पावत्या, पासबुक जमा करुन पोहोच घ्यावी. कराड जनता बँकेत पडताळणी करुन पुढील सात दिवसात संबंधीत ठेवीदारांना त्यांनी कळविलेल्या अन्य बँकेतील खात्यात रकमा जमा देणेबाबत ठेव हमी पतविमा महामंडळाच्या सूचनेनुसार बँक आँफ बडोदाला यादी पाठवण्यात येईल.

बँक आँफ बडोदाच्या मुंबईमधील ताडदेव शाखेमार्फत कराड जनता बँकेने सादर केलेल्या यादीनुसार संबंधीत ठेवीदारांच्या खात्यावर क्लेम मंजूर रकमा वर्ग होतील. त्या बँकेत कोविड परस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी, स्टाफची समस्या यामुळे ठेवीदाराने त्यांच्या मुळ पावत्या जमा केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम येण्यास साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

क्लेमफॉर्म जमा केलेल्या काही ठेवीदारांचे प्रस्ताव तांत्रीक अडचणींमुळे मंजूर झालेले नाहीत, त्यांना बँकेमार्फत संपर्क करुन आवश्यक त्रुटी दूर करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. तर ज्या ठेवीदारांनी अद्यापपर्यंत क्लेमफॉर्म जमा केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर नजीकच्या शाखेत आवश्यक कागदपत्रांसह जमा करावेत, असे आवाहनही केले आहे. क्लेमफॉर्म डीआयसीजीकडे पाठवून मंजूर झाल्याशिवाय कोणालाही ठेव रक्कम मिळणार नाही, असेही मनोहर माळी यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि शासनाचे निर्बंध याचा विचार करता कोणत्याही परस्थितीत ठेवीदारांनी शाखांमध्ये गर्दी करु नये. मंजूर यादीप्रमाणे ज्यांना शाखेमार्फत सूचना येईल त्यांनीच दिलेल्या वेळेत मूळ कागदपत्रांसह संबंधीत शाखेत संपर्क करावा.
-मनोहर माळी, अवसायक,उपनिबंधक, कराड

आपली प्रतिक्रिया द्या