रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे फरार घोषित; स्वतःहून हजर होण्याची दिली संधी

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याला पारनेर न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी गुरुवारी हा आदेश दिला. न्यायालयाने 9 एप्रिलपर्यंत त्याला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. तो हजर राहिला नाही तर त्याची मालमत्ता जप्त करण्यासह अन्य पुढील कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बोठे याला फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी पारनेर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तपासी अधिकारी अजित पाटील यांनी सीआरपीसी कलम 82 प्रमाणे हा अर्ज दाखल केला होता. 1 मार्च रोजी दाखल केलेल्या या अर्जासंदर्भात न्या. बोर्‍हाडे यांच्या न्यायालयासमोर बुधवारी सुनावणी झाली. त्यानंतर अंतिम आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला.

न्यायालयाने पोलिसांचा अर्ज मंजूर केला आहे. जरे हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुध्द 26 तारखेला पोलिसांनी पारनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. बोठे याच्या विरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला जरे यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे, फिरोज राजू शेख, आदित्य सुधाकर चोळके, सागर भिंगारदिवे, ऋषिकेश पवार या पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

बोठे हा शोधूनही सापडलेला नाही. मध्यंतरी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल करुन बोठे यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट घेतले होते. बोठेच्या शोधासाठी आणखी दोन पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. बोठेला फरार घोषित केल्यामुळे आता त्याच्या मालमत्तेच्या संदर्भात पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. बोठे याला न्यायालयाने गुरुवारी फरारी घोषित केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केलेली आहे. न्यायालयाने 9 एप्रिलपर्यंत त्याला स्वतःहून हजर राहण्याचे सांगितले आहे. तो हजर राहिला नाही तर पुढील कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले आहेत.

पुढील कारवाईमध्ये त्याच्या मालमत्तेवर टाच आणली जाणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी त्याची तयारी सुरू केली आहे.त्याच्या संपत्तीची माहिती संकलित केल्याचे समजते. बोठे याला फरार घोषित केल्याने आता पोलिसांकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर ठिकठिकाणी बोठे फरार असल्याचे पोस्टर्स चिटकवले जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणांमध्ये बोठे फरार असल्याविषयी जाहीर उद् घोषणा करण्यात येणार आहे.

पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करणार
रेखा जरे यांचा हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात फरार घोषित करण्याचा अर्ज न्यायालयात केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला असून लवकरच कायदेशीर कारवाईची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या