पीडिताच्या मृतदेहाची अवहेलना सुरुच; मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

घनसांवगी तालुक्यातील 19 वर्षांच्या तरुणीवर चेंबूरच्या लालडोंगरीत सामूहिक अत्याचार झाल्याने तिचा मृत्यू झाला. गुन्हेगारांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास तिच्या नातेवाईकांनी नकार दिल्यामूळे पीडितेचा मृतदेह घाटीतील शीतगृहात ठेवण्यात आला आहे. पीडिताच्या मृतदेहाची अवहेलना तिच्या नातेवाईकांकडूनच होत असल्याचे  पोलिसांनी सांगितले.

घनसावंगी तालुक्यातील 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याने तिचा  घाटी रुग्णालयात 28 ऑगस्टला मृत्यू झाला. या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांना या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनी कळवली. चुन्नाभट्टी पोलीस ठाण्याचे तपासअधिकारी शिर्के आपल्या पथकासह संभाजीनगरात आले. शवविच्छेदन करण्यासाठी पंचनामा आणि जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीडिताच्या नातेवाईकांनी अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना अटक होत नाही, तोपर्यंत पीडिताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांसमोर पेच उभा राहिला आहे. बेगमपूरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे शिर्के यांनी पीडिताच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईंकांनी पोलिसांचे म्हणणे एकले नाही. पोलिसांनी दबाव टाकून  शविच्छेदन केले तर आत्मदहन करण्याचा इशारा पीडिताच्या नातेवाईकांनी दिला आहे. शवच्छिेदन झाले नसल्याने पीडितेच्या नातेवाईकांकडून मतदेहाची अवहेलना होत असल्याचे पालिसांनी सांगितले. त्यांना समजविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि तपास अधिकारी शिर्के यांनी सांगितले.

पीडिताच्या नातेवाईकाची समजूत काढण्यात तपास अधिकाऱ्यांना अपयश आल्याचे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजले. त्यानंतर पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी घाटीत धाव घेऊन नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.