विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला काळे फासले, शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा विचारला जाब

एकीकडे अवकाळी पाऊस, कडक ऊन अशा लहरी हवामानामुळे शेतीची दुर्दशा झालेली असताना पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चक्क दोन, पाच आणि दहा रुपयांची मदत देऊन त्यांची थट्टा सुरू आहे. याविरोधात यवतमाळमध्ये मंगळवारी शिवसेना प्रचंड आक्रमक झालेली दिसली. पीक विमा कंपनीच्या व्यवस्थापकासह जिल्हा कृषी अधीक्षकांना कारेगाव यावली शेतशिवारात पाहणीसाठी नेले आणि वस्तुस्थिती दाखवली. विमा कंपनीच्या धोरणांचा निषेध करत रिलायन्स विमा पंपनीच्या अधिकाऱ्याला काळे फासण्यात आले.

सोयाबीनची फुले करपून गेली. शेतकरी कर्जबाजारी झाले. अशा स्थितीत पीक विमा कंपन्यांकडूनही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असून जिह्यात पीकविमा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेच्या किशोर इंगळे आणि संजय रंगे यांनी केला आहे. दरम्यान, विमा पंपन्यांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करू नये, असे आवाहन कृषी अधीक्षकांनी केले असून या प्रकरणी विमा पंपनीने पोलिसांत तक्रारही दिली.

जिह्यातील तब्बल 8 लाख 44 हजार शेतकऱ्यांनी 509 कोटींचा विम्याचा हप्ता भरला. यंदा अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यापोटी विमा पंपनीने शेतकऱ्यांना तीन हजार 177 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात 59 हजार शेतकऱ्यांना 41 कोटी 10 लाख 61 हजार 781 रुपयेच देण्यात आले. जवळपास 8 लाख शेतकरी  भरपाईपासून वंचित आहेत.

9 हजार शेतकऱ्यांना हजार रुपयेही नाही

यवतमाळ जिह्यातील शेतकऱ्यांना 10 रुपयांहून कमी पीक विमा नुकसानभरपाई मिळाली असून जिह्यातील 78 शेतकऱ्यांना विमा पंपनीने पाच रुपयांपेक्षाही कमी मदत दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दिवाळीपूर्वी विमा पंपनीने 59 हजार शेतकऱ्यांना 41 कोटींची मदत जाहीर केली. यातील 9 हजार 727 शेतकऱ्यांना एक हजार रुपयेही मदत मिळाली नाही. अनेक शेतकऱ्यांना दोन, पाच आणि दहा रुपये अशी नुकसानभरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात तर 200, 500 आणि 1000 रुपयांची मदत जमा झाल्याचा प्रकारही यादीतून समोर आला आहे.