
रिलायन्स इंडस्ट्रीजने आयएमजी वर्ल्डवाईड या जागतिक पातळीवरील नामांकित कंपनीच्या क्रीडा व्यवस्थापन संयुक्त उपक्रमातील 50 टक्के हिस्सेदारी विकत घेणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. 52.08 कोटी रुपयांमध्ये हा रोखीने व्यवहार होईल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजारांना कळवले आहे. या व्यवहारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज आयएमजी-आर कंपनीचे नव्याने ब्रॅण्डींग करणार आहे.
आयएमजी ही क्रीडा, फॅशन, आयोजन आणि मिडीया अशा विविध क्षेत्रांतील आघाडीची कंपनी आहे. 30 हून अधिक देशांमध्ये या कंपनीचे कामकाज चालते. रिलायन्स इंडस्ट्रीजने आयएमजी वर्ल्डवाईडसमवेत 2010 मध्ये समान भागिदारीचा संयुक्त उपक्रम तयार केला होता. देशातील क्रीडा आणि मनोरंजनासाठी हा संयुक्त उपक्रम बनवण्यात आला होता. आयएमजी-आरमध्ये आयएमजी सिंगापूर पीटीई लिमिटेडद्वारे ठेवलेल्या शेअर्ससाठी 52.08 कोटी रुपयांचा खरेदी करार केल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजने जाहीर केले आहे. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज ही आयएमजी-आर कंपनीवर पूर्ण मालकी असणारी सहाय्यक कंपनी बनणार आहे.
आयएमजी-आर कंपनीची चालू वर्षातील उलाढाल 181.7 कोटी रुपये असून निक्वळ नफा 16.35 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी या कंपनीचा टर्नओव्हर 195.5 कोटी रुपये, तर निक्वळ नफा 19.25 कोटी रुपये होता. शेअर बाजारात गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2.58 टक्क्यांनी वाढून 1993.90 रुपयांवर बंद झाला होता.



























































