खांदेरी किल्ल्यावर सापडले मंकला, वाघबकरी खेळांचे अवशेष; अभ्यासकांनी लावला शोध

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असणाऱ्या व सरखेल कान्होजी आंग्रे, सरखेल मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अलिबागच्या थळ येथील खांदेरी किल्ल्यावर मंकला आणि वाघबकरी खेळांचे अवशेष सापडले आहे. जलदुर्गभोवती विविध ठिकाणी हे खेळ कोरलेले आहेत. बैठ्या खेळांच्या अभ्यासकांनी याचा शोध लावला.

अलिबाग तालुक्यातील खांदेरी किल्ल्यावर मंकला आणि वाघबकरी खेळांचे अवशेष सापडले आहेत. बैठ्या खेळांच्या शोधमोहिमेत खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीवर काही खेळांचे कोरीव अवशेष सापडले असून याची एकूण संख्या बारा आहे. दुर्गभोवतीच्या तटबंदीवर विविध ठिकाणी हे कोरलेले आहेत. ‘आर्ट ऑफ प्लेईंग’ आणि ‘आपला कट्टा’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले, ममता भोसले, केतकी पाटील, सिद्धेश गुरव, अनिकेत पाटील यांनी सहभाग घेतला.

कौशल्य वाढवणारा खेळ
जमिनीवर किंवा कातळावर समांतर रेषेमध्ये समोरासमोर सात, आठ किंवा त्याहूनही अधिक खड्डे पाहायला मिळतात. या खेळाचे नाव ‘मंकला’ आहे. गणिताचे कौशल्य वाढवणारा हा खेळ जगभर विविध नावाने प्रसिद्ध आहे. खांदेरी किल्ल्यावर या खेळाचे एकूण १० पट सापडले. इथे सापडलेल्या एका मंकला पटाचे वैशिष्ट्य असे की इथे सात, आठ खड्ड्यांऐवजी एकूण २७ खड्डे (एकाच पटात) दिसून आले आहेत. ‘वाघ बकरी’ हा खेळ शिकारीचा खेळ म्हणून ओळखला जातो. वाघाने जास्तीत जास्त बकरीची शिकार करायची आणि बकरीने बचाव करून वाघास कोंडीत पकडायचे, असे नियोजनकौशल्य वाढवणारा हा खेळ आहे. खांदेरीच्या तटबंदीवर अशा प्रकारचे दोन पट सापडले आहेत.