रेमडेसिविर इंजेक्शनच्या नावाखाली लावायचे चुना; 210 जणांची केली फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड काळात रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड्स आणि कोरोनाच्या लसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱया बिहारमधील बनावट कॉल सेंटरचा सायबर सेलने पर्दाफाश केला. धरम जयकुमार, धनंजय कुमार, शरवन पासवान, नितेश कुमार, सुमंत कुमार यांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केलेले आरोपी हे उच्चशिक्षित असून या टोळीने आतापर्यंत 210 जणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

कोविडच्या दुसऱया लाटेत काही जण हे रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड्स, कोरोनाच्या लसीच्या नावाखाली सोशल मीडियावर जाहिरात करून फसवणूक करत आहेत. जून महिन्यात सायबर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाली. तक्रारदारांना कोविडची लागण झाल्याने त्यांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती. त्यांनी सोशल मीडियावरील जाहिरात पाहून एका नंबरवर फोन केला. फोन करून इंजेक्शनची ऑर्डर करत पैसे बँक खात्यात जमा केले. पैसे जमा केल्यावर इंजेक्शन न मिळाल्याने तक्रारदारांनी सायबर सेल पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मजगर, सहायक निरीक्षक अलका जाधव, देसाई, पडसळकर, लोकरे,  जाधव यांनी तपास सुरू केला. तपास सुरू असताना ज्या खात्यात पैसे जमा झाले होते, त्याची माहिती काढली. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. सायबर पोलिसांचे पथक हे बिहारच्या नालंदा जिह्यातील शरीफ येथे गेले. बिहार पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मुकेश कुमारची मदत मोलाची ठरली. नक्षलवादी भागात जाऊन पोलिसांनी रात्रीच्या वेळेस छापे टाकले. पोलिसांनी प्रथम धरमला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर उर्वरित जणांना ताब्यात घेऊन फसव्या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.

कोलकाता येथून आणली 100 बनावट सिमकार्ड बँक

अटक केलेले हे पूर्वी नागरिकांना बजाज फायनान्सच्या लोन अॅप्सच्या नावाखाली चुना लावत असायचे, पण या टोळीने कोविड काळात औषधे, दवाखान्यातील बेड्स, कोविड लसीच्या नावाखाली फसवणूक करण्यास सुरुवात केली. फसवणुकीसाठी लागणारे 100 सिमकार्ड या टोळीने 3 महिन्यांपूर्वी कोलकाता येथून आणले होते. ते सिमकार्ड बनावट कागदपत्रे सादर करून घेतल्याचे तपासात समोर आले होते.