जाडेजाने फटकेबाजी करायला हवी होती, माजी कर्णधार अनिल कुंबळेचे मत

रवींद्र जाडेजाने लॉर्ड्सच्या मैदानावर तळातल्या गोलंदाजांबरोबर भागीदारी रचत तिसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन केले खरे, मात्र अखेरच्या क्षणी हिंदुस्थानला अवघ्या 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. जाडेजाने जोखीम पत्करून मोहम्मद सिराजला स्ट्राईक देण्याऐवजी स्वतः फिरकी गोलंदाज शोएब बशीरविरुद्ध आक्रमक फटके मारायला पाहिजे होते, असे मत हिंदुस्थानचे माजी कर्णधार अनिल कुंबळेने व्यक्त केले.

लॉर्ड्स पराभवानंतर एका क्रिकेटवाहिनीवर बोलताना अनिल कुंबळे म्हणाला, मला आठवते चेन्नईमध्ये हिंदुस्थानला पाकिस्तानकडून 12 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात ऑफस्पिनर सकलेन मुश्ताकने जवागल श्रीनाथला बाद केले होते. सोमवारीदेखील फिरकीपटू बशीरने सिराजला बाद केल्यानंतर त्या सामन्याच्या आठवणी ताज्या झाल्या.