
पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी आयुष्य समर्पित करणारे जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी डॉ. गाडगीळ यांनी अतुलनीय योगदान दिले होते. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पर्यावरण क्षेत्रात काम करणारे प्रतिनिधी, विद्यार्थी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. माधव गाडगीळ हे गेले काही दिवस आजारी होते. पुण्यातील डॉ. शिरिष प्रयाग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे मुलगा सिद्धार्थ, सून, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतातील पर्यावरणविषयक जाणिवा आणि विशेषतः पश्चिम घाटांमधील जैवविविधतेबाबतच्या संवेदना जिवंत ठेवणं आणि त्या प्रगल्भ करणं यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. पश्चिम घाटांमध्ये राबवल्या जाणाऱया विकासकामांमुळे घाटातील जीवसृष्टी आणि एकूण पर्यावरणीय समतोलासाठी मोठं संकट निर्माण होऊ शकतं, हा धोक्याचा इशारा सर्वप्रथम डॉ. माधव गाडगीळ यांनीच सरकार व प्रशासनाला दिला होता. पश्चिम घाटाच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी 2011 साली तयार केलेला गाडगीळ अहवाल म्हणजे विकासकामांसाठी पर्यावरणाला धक्का पोहोचवण्यासाठी कायम तयार असलेल्या मानसिकतेला ढळढळीत वास्तव दाखवणारा आरसा ठरला.
चॅम्पियन्स ऑफ दी अर्थ
डॉ. माधव गाडगीळ यांनी भारतातील पर्यावरणविषयक मुद्दय़ांवर दिलेल्या योगदानाची दखल संयुक्त राष्ट्र संघानेदेखील घेतली. गाडगीळ यांना 2024 सालच्या यूएनईपीचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत डॉ. माधव गाडगीळ यांचा प्रवास हार्वर्ड विद्यापीठाच्या सभागृहांपासून ते भारत सरकारच्या उच्चपदापर्यंत झाला. पण या संपूर्ण प्रवासात माधव गाडगीळ यांनी स्वतःला ‘जनतेचा वैज्ञानिक’च मानलं, अशा शब्दांत यूएनईपीच्या निवेदनात डॉ. माधव गाडगीळ यांचा गौरव करण्यात आला होता.
अल्पपरिचय
- माधव धनंजयराव गाडगीळ यांचा जन्म 24 मे 1942 रोजी पुणे येथे झाला. पुणे येथे शालेय शिक्षण आणि बी.एससी पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी एम.एससी केले. अमेरिकेतील प्रतिष्ठत हार्वर्ड विद्यापीठात पीएच.डी केली.
- 1971 साली ते भारतात परत आले. आयआयएससी बंगळूरू येथे 30 वर्षे अध्यापन केले. याच संस्थेचे 2004 मध्ये ते चेअरमन झाले.
- पर्यावरण संवर्धनासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी विपुल लेखन केले. देश-विदेशातील अनेक विद्यापीठांमध्येही त्यांनी अध्यापन केले.
- 2010च्या ‘वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनेल’ (WGEEP) चे प्रमुख, ज्याला ‘गाडगीळ आयोग’ म्हणून ओळखले जाते.
- डॉ. माधव गाडगीळ यांना देश-विदेशातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यामध्ये शांतीस्वरूप भटनाघर पुरस्कार, ‘व्होल्वो पर्यावरण पुरस्कार’ आणि पर्यावरणीय कामगिरीसाठी ‘टायलर’ पुरस्काराचा समावेश आहे.
- 1981 मध्ये ‘पद्मश्री’ आणि त्यानंतर 2006 मध्ये तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ‘पद्मभूषण’ने सन्मानित केले.
- 2022 चा ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’
- 2024चा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा ‘संयुक्त राष्ट्रसंघा’चा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान.



























































