वसंतराव मोडक यांचे निधन

ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या जमान्यापासून आताच्या डिजिटल काळापर्यंत छायाचित्रणाच्या विश्वात आपला आगळावेगळा ठसा उमटवलेले प्रसिद्ध छायाचित्रकार आणि व्हिडीओग्राफर वसंतराव मोडक यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, जावई असा परिवार आहे.

ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटोग्राफी करताना वसंतरावांनी त्यालाही आधुनिकतेची जोड दिली. 65 वर्षांच्या छायाचित्रणाच्या कारकीर्दीत वसंतरावांनी ठाण्याचा इतिहासच आपल्या छायाचित्रातून टिपला आणि जपला. 1990 च्या सुमारास व्हिडीओ टेक्नॉलॉजी प्राथमिक अवस्थेत असतानाच वसंतरावांनी काळाची पावले ओळखून फोटोग्राफीतून व्हिडीओग्राफी क्षेत्रात प्रवेश करत त्यात अनेक यशस्वी प्रयोग केले. नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्याचा त्यांचा उत्साह वयाच्या नव्वदीतही कायम होता. त्यांनी फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीत केलेले प्रयोग या क्षेत्रातील तरुणांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत.