अंबाई जलतरण तलावाची दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलन शिवसेनेने अधिकाऱयांना धरले धारेवर

गेल्या वर्षी तब्बल वीस लाख रुपये खर्चूनसुद्धा ऐतिहासिक रंकाळा तलावालगत असलेल्या अंबाई जलतरणाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याप्रकरणी अक्षम्य दुर्लक्ष करणाऱया महानगरपालिका अधिकाऱयांना आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) शिवसैनिकांकडून चांगलेच धारेवर धरण्यात आले. तलावाची दुरुस्ती लवकर न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी उपनगरअभियंता एन. एस. पाटील, इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, अवधुत साळोखे, स्मिता सावंत-मांडरे, प्रतिज्ञा उत्तुरे, दिनेश परमार, विशाल देवकुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना पोहण्यासाठी अंबाई जलतरण तलाव महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आला आहे. त्यातून महापालिकेस चांगले उत्पन्नही मिळत असताना, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सध्या हा तलाव हिरवागार दूषित पाण्याचे डबके बनलेला आहे. अनावश्यक खर्च आणि अधिकाऱयांच्या अनास्थेमुळे हा चांगला तलाव बंद पडण्याच्या अवस्थेत आहे. तलावाची गळती काढण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे 20 लाख रुपये खर्च करून नूतनीकरणाचा प्रयत्न केला गेला. पण हा खर्च ठेकेदारांना पोसण्यासाठीच केल्याचे दिसून येत असून तलावाच्या नूतनीकरणासंबंधी अनेकदा निवेदने, आंदोलने करूनही महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले. फिल्टरचा प्लांट बंद झाला असून, तो बदलण्याची गरज आहे. शिवाय फिल्टर ऑपरेटर, पहारेकरी व पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी तसेच तलावाची स्वच्छता करून पोहण्यासाठी चांगल्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली.