दराडे दाम्पत्याच्या हट्टापायी, मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती रखडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पल्लवी दराडे आणि प्रवीण दराडे यांच्या हट्टापायी पालिकेच्या मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती रखडली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या जलाशयाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे आढळून आले आहे. पण या जलाशयाच्या वर असलेला पालिकेचा बंगला रिकामा करण्यास दराडे दांपत्य तयार नसल्यामुळे ही दुरुस्ती करता येत नसल्याची कबुली प्रशासनानेच दिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात होणार आहे. मात्र महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. महापौर निवासस्थानासाठी शिवसेनेने मलबार हिल येथील पाणी खात्याच्या बंगल्याचा पर्याय सुचवला होता. मात्र माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे या सध्या त्या बंगल्यात राहत असून त्या बंगला सोडण्याचे नावच घेत नाहीत. याबाबत शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विधी समितीमध्ये जून महिन्यात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्दय़ाला अभिप्राय देताना प्रशासनाने ही धक्कादायक कबुली दिली आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार उत्तराला शीतल म्हात्रे यांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रशासनाच्या चालढकल कारभाराचा निषेध करीत म्हात्रे यांनी सभात्याग केला. त्यानंतर अध्यक्षा सुवर्णा कारंजे यांनी सभा तहकूब केली.

सर्वसामान्यांचा कायदा दराडेंना लावा

सर्वसामान्य व्यक्तीने पालिकेची जागा अशी अडवली असती तर प्रशासनाने त्यांना सर्व शक्तिनिशी हुसकावून लावले असते. मग दराडे दांपत्यांना वेगळा न्याय का, असा सवाल म्हात्रे यांनी या वेळी केला. कायदेशीर कारवाई करण्यास दोन महिने का लागले, असाही सवाल त्यांनी केला. मात्र अधिकाऱ्यांना त्याबाबत काहीही उत्तर देता आले नाही.

दराडेंचा उर्मटपणा

मलबार हिल जलाशय हे सन १८८१ पासून वापरात असून त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने दराडे यांना बंगला रिकामा करण्यासाठी नोटीस मे महिन्यात बजावण्यात आली होती. मात्र त्यांनी त्यास नकार दिला व पुन्हा नोटीस पाठवू नये, असे पालिकेलाच बजावले आहे. त्यामुळे दराडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे लेखी उत्तर जल अभियंता विभागाने दिले आहे. मात्र अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.