मैत्रिणीला वाचवायला गेला आणि पाकिस्तानात फसला, 6 वर्षांनी मुंबईत परतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hamid-ansari

सामना ऑनलाईन । मुंबई

सोशल मीडियावर झालेले मैत्री आणि त्या मैत्रीखातर आपला जीव धोक्यात टाकणं हामिद अंसारी या हिंदुस्थानी तरुणाला चांगलंच महागात पडलं. हामिदाला पाकिस्तानच्या कोठडीत राहावं लागलं. अखेर हिंदुस्थान सरकारच्या मदतीने त्याच्या आई-वडिलांनी लढलेल्या न्यायालयीन लढाईमुळे त्याची सुटका झाली असून तो आज मुंबईत परतला.

हामिदने सोशल मीडियावरून एका मुलीशी मैत्री केली. ती पाकिस्तानची होती. त्यांचा एकमेकांशी संवाद वाढत गेला. अचानक एकेदिवशी तिचा मेसेज आला की, घरचे तिच्या मनाविरुद्ध तिचे लग्न लावून देत आहेत. अखेर हामिदने तिला वाचवण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला, पण त्याला व्हिसा नाकारण्यात आला. मग त्याने सोशल मीडियावरून एका एजंटशी संवाद साधला आणि अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तानात दाखल झाला. पाकिस्तानमध्ये या एजंटने त्याला बनावट कागदपत्र दिली आणि मग हामिद त्या मुलीच्या घरी जाण्यास निघाला. मात्र त्याला तिथे पोलिसांनी पकडले आणि तपास यंत्रणांच्या हाती सोपवले. तेव्हा आपल्याशी संवाद साधणारी मुलगी नसून या एजंटनेच आपल्याला फसवल्याचे हामिदच्या लक्षात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात दाद मागितली. अखेर हिंदुस्थान सरकारच्या मदतीने त्याची सुटका झाली.

अटारी-वाघा सीमेवरून हामिद बुधवारी हिंदुस्थानात परतला. त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.