
मुंबईतील पत्रकारांना ‘चायबिस्कुट पत्रकार’ म्हणून हिणवणाऱया रिपब्लिक भारत टीव्ही चॅनेलच्या रिपोर्टरला मुंबईतील पत्रकारांनी आज चांगलाच चोप दिला. दिल्लीतल्या पत्रकाराला चोप देणाऱया मुंबईतील पत्रकाराला पत्रकार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर तर मुंबईतल्या पत्रकाराला पाठिंबा देणाऱया शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. फेसबुक-ट्विटरवर रिपब्लिक भारतच्या पत्रकाराला चांगलेच ट्रोल केले आहे.
या प्रकरणी न्यूज 24 चे पत्रकार विनोद जगदाळे यांनी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये एनसी दाखल केली आहे. त्यामध्ये रिपब्लिक भारतचा रिपोर्टर प्रदीप भंडारी यांनी आपल्या शर्टाची कॉलर खेचून धक्काबुक्की केली व आई बहिणीवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जगदाळे यांच्या गालावर मारून ‘मै तुम्हे देख लुंगा, मै क्या चीज हूँ तुम्हे मालूम नही’ अशी धमकी दिली तसेच इतर साक्षीदारांना धक्काबुक्की करून शिविगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
मुंबईतल्या पत्रकारांना चायबिस्कुट म्हणून हिणवणाऱया रिपब्लिक भारतच्या रिपोर्टरचा सर्वत्र निषेध होत असून मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, क्राईम रिपोर्टर असोसिएशन व टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने आपल्याला पाठिंबा दिला आहे असे विनोद जगदाळे यांनी सांगितले. व्हॉटसऍप, फेसबुक व ट्विटरवर मुंबईतल्या असंख्य पत्रकारांनीही विनोद जगदाळे यांना पाठिंबा दिला असून मुंबईतील पत्रकार तुमच्या पाठीशी उभे असल्याचे नमूद केले आहे.

























































