देवभूमीत युद्धपातळीवर ‘रेस्क्यू ऑपरेशन’; 27 जणांना वाचवले; 197 लोक अद्याप बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमकडा कोसळून भीषण जलप्रलय घडलेल्या देवभूमीत सोमवारीही युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले. ऋषिगंगा व धौलीगंगा नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होताच बचावकार्याला गती देण्यात आली. लष्करासह एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपीच्या शेकडो जवानांनी रविवारी मध्यरात्रीच बोगद्यातील गाळ उपसत आत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. दिवसभरात 27 जणांना वाचवण्यात आले, तर 26 जणांचे मृतदेह सापडले. आणखी 197 लोक अद्याप बेपत्ता आहेत.

उत्तराखंडच्या चमोली जिह्यातील जोशीमठाजवळ रविवारी हिमकडा कोसळला. त्यावेळी एनटीपीसीच्या तपोवन प्रकल्पाच्या ठिकाणी 191 मजूर काम करीत होते. यापैकी 27 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर 11 लोकांचे मृतदेह सापडले. येथून बेपत्ता झालेल्या 153 मजुरांपैकी जवळपास 50 मजूर बोगद्यात अडकल्याची शक्यता आहे. हा बोगदा साधारण अडीच किलोमीटर लांब आहे.

20 तासांत बोगद्याच्या 100 मीटर भागातील गाळ काढण्यात आला. त्यापुढील 250 मीटर लांब भागात मोठय़ा प्रमाणावर गाळ साचल्याने बचाव व शोधकार्यात अडथळा येत आहे. तसेच ऋषिगंगा प्रकल्पावरील 22 मजूर अजूनही बेपत्ता आहेत. दुसऱया एका बोगद्यात फसलेल्या 12 जणांना बाहेर काढण्यात आले. याठिकाणी आयटीबीपीचे जवळपास 300 जवान तैनात आहेत. ऋषिगंगा व धौलीगंगा नदीची पाणीपातळी रविवारी रात्री पुन्हा वाढली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.

हवाई दलाची शक्तिशाली हेलिकॉप्टर्स तैनात

हवाई दलाने बचावकार्यात आवश्यक अवजड मशीन पोहोचवण्यासाठी एमआय-17 आणि चिनूक ही शक्तिशाली हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. तसेच लष्कराने तात्पुरते रुग्णालय उभारले आहे. गाळातून बाहेर काढलेल्या लोकांवर या रुग्णालयात तातडीचे उपचार केले जात आहेत.

संयुक्त राष्ट्रानेही मदतीचा हात पुढे केला

उत्तराखंडच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्रानेही पुढाकार घेतला आहे. हिंदुस्थानला उत्तराखंडच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आवश्यक ती सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरस यांनी सांगितले.

बचावकार्यासाठी 20 कोटींचा निधी

मुख्यमंत्री रावत यांनी बचावकार्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाला 20 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. तसेच भविष्यात सावधगिरी बाळगण्यासाठी इस्त्र्ााsच्या शास्त्र्ाज्ञांची मदत घेण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले.

मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी; पंतप्रधानांची दिल्लीत बैठक

उत्तराखंडच्या भाजप खासदारांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी जलप्रलयातील नुकसानीची माहिती जाणून घेतली. दुसरीकडे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत, केंद्रीय मंत्री आर. के. सिंह, रमेश पोखरियाल निशंक यांनी जोशीमठ परिसरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.