
एसटी स्थानकातील तिकीट आरक्षण खिडकी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे. प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंग करावी लागत असून अनेक प्रवाशांना दलालांच्या मध्यस्थीने तिकीट आरक्षित करावे लागते. आरक्षणासाठी दलाल जास्त पैसे उकळत असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. आधीच एसटी स्थानकाची दुरवस्था त्यात आरक्षण मशीन बंद पडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पाली येथून ठाणे, पुणे, मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही खिडकी सुरू करावी अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पाली शहराध्यक्ष विद्देश आचार्य यांनी दिला आहे. तर मशीनमध्ये बिघाड झाल्याने ती बंद असून नवीन मशीनसाठी पेण कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती एसटी कंट्रोलर रोहिदास कोकणे यांनी दिली.
























































