एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित रहिवाशांचे दादर, माटुंगा, परळमध्ये पुनर्वसन होणार; म्हाडा एमएमआरडीएला देणार घरे

एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील 83 रहिवाशांचे पुनर्वसन माटुंगा, दादर, प्रभादेवी, परळ आणि शिवडी येथे उपलब्ध असलेल्या म्हाडाच्या घरांमध्ये केले जाणार आहे. यासाठी लवकरच म्हाडा ही घरे एमएमआरडीएकडे सुपूर्त करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पूल तोडून डबलडेकर पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाचे पिलर उभारण्यासाठी हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होणार आहेत. लक्ष्मी निवास या इमारतीत 60 तर हाजी नुरानी या इमारतीत 23 रहिवासी आहेत. याच परिसरात आम्हाला घरे द्या…आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय एल्फिन्स्टन पुलाचे तोडकाम करू देणार नाही, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली होती. अखेर रहिवाशांच्या आंदोलनापुढे सरकार झुकले. बाधित रहिवाशांचे पुनर्वसन या परिसरात उपलब्ध असलेल्या म्हाडाच्या घरांमध्ये करण्याचे आश्वासन सरकारने दोन आठवड्यांपूर्वी दिले होते.

त्यानुसार म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईतील या परिसरात उपलब्ध असलेल्या 119 घरांची यादी एमएमआरडीएला दिली आहे. त्यापैकी 83 घरांची निवड एमएमआरडीए पुनर्वसनासाठी करणार आहे. रहिवाशांना घरांचे वाटप करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर असणार आहे. आता रहिवासी काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

म्हाडाची ही घरे विखुरलेली असून 350 ते 650 चौरस फुटांची आहेत. यातील बरीचशी घरे चार ते पाच वर्षांपासून बंद असल्यामुळे त्यांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. या घरांसाठी म्हाडा रेडीरेकनरच्या 110 टक्के दराने एमएमआरडीएकडून पैशांची मागणी करणार आहे. यातून म्हाडाच्या तिजोरीत 100 कोटींहून अधिकचा महसूल जमा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.