
घोडबंदर रोडवरील सेवा रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम सुरू आहे. या रुंदीकरणाला सर्व गृहसंकुले, आस्थापना आणि शाळांचा विरोध आहे. मात्र स्थानिकांचा विरोध डावलून एमएमआरडीएने कामाला सुरुवात केल्याने घोडबंदरवासीयांनी रस्त्यावर उतरून हे काम बंद पाडले.
गेल्या तीन महिन्यांपासून घोडबंदर मार्गावर सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता जोडून महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. या भागातील सेवा रस्ता महामार्गात समाविष्ट करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रुंदीकरणाला स्थानिकांनी विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात आंदोलन, मोर्चा काढून निषेध करण्यात आला. सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडणे हे बेकायदेशीर असल्याचे सांगत याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला.
आंदोलन मागे घेतले
रहिवाशांनी याबाबत भाजप आमदार संजय केळकर यांना काम तत्काळ थांबविण्याची मागणी केली. केळकर यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. तसेच स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करू नका, असा इशारा केळकर यांनी दिला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या मार्गालगतची गृहसंकुले, वाणिज्य आस्थापना आणि शाळा यांना सेवा रस्ता हा एकमेव आधार होता. या सेवा रस्त्यावरून नागरिकांना विशेषतः ल हान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता येत होते, परंतु सेवा रस्ता मुख्य मार्गाला जोडल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याचे प्रमाण वाढणार आहे.
सागर कुलकर्णी (स्थानिक नागरिक)


























































