
मुंबईमध्ये राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या टाटासकट चार मिल्स आहेत. मात्र कोरोना काळात या वस्त्रोद्योग गिरण्या बंद पडल्या आणि त्यानंतर त्या पूर्ववत सुरू झाल्यानंतर काम करणाऱया कामगारांपैकी बहुतांश कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात आलेले नाही, त्यामुळे या कामगारांना अनेक प्रकारच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या मजुरांचे घराचे हप्ते आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे अडकून पडले आहेत आणि त्यांना विलक्षण आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या गंभीर समस्येची गंभीरपणे दखल घेऊन यातून मार्ग काढून गिरणी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी आज शिवसेनेने लोकसभेत केली.
लोकसभेत शून्य प्रहरात शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी गिरणी कामगारांच्या या गंभीर समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कोरोनामुळे गिरणी कामगार उद्ध्वस्त झाले आहेत. नव्वद टक्के कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आलेले नाही. या संदर्भामध्ये मी शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय गिरणी कामगार महासंघासकट गिरणी कामगारांच्या अनेक संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केलेली आहे. राष्ट्रीय वस्त्राsद्योग महामंडळाच्या अखत्यारित येणाऱया गिरणी कामगारांना सरकारने तातडीने न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी अनिल देसाईंनी यावेळी केली.



























































