मालवणात संचारबंदीची कडक अंमलबजावणी; दिवसरात्र गस्त सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 15 दिवसांसाठी संचारबंदीसह लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी मालवण शहर परिसरात पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. बाहेर फिरणाऱ्यांची चौकशी करत अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शहराचे प्रवेशद्वार देऊळवाडा, कोळंब यासह भरडनाका,बाजारपेठ, पिंपळपार याठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 50 पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. दिवसभर दोन अधिकारी 40 कर्मचारी व रात्री एक अधिकारी व 10 कर्मचारी बंदोबस्त ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबत हडी, देवबाग, कट्टा, मसुरा या मार्गावर गस्त तैनात ठेवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ओटवणेकर स्वतः रस्त्यावर उतरुन नागरिक आणि विक्रेते यांना सूचना देत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. हॉटेल, छोटी दुकाने याठिकाणी बसून काहीजण नाश्ता करत असल्याचे दिसून आले. त्यांनाही सूचना देत यापुढे फक्त पार्सल सेवाच सुरू ठेवण्याच्या सूचना देताना पुन्हा दिसल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला.

बाजरेपेठेत कडक सूचना
मालवण बाजारपेठ गुरुवारी सकाळी पोलीस व नगरपालिका पथक यांनी फिरून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेतील जे विक्रेते होते त्यांना कोरोना आरटीपीसीआर टेस्ट करूनच व्यवसाय करण्याच्या सूचना केल्या. यात व्यापारी तसेच फळ व भाजी विक्रेते यांचा समावेश आहे. तसेच कोरोना खबरदारी नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या. मास्कचा वापर प्राधान्याने केलाच पाहिजे, कुठेही गर्दी होणार नाही याची खबरदारी विक्रेत्यांनी घ्यावी. अशाही सूचना देण्यात आल्या.