
कोर्टाच्या कामकाजात राजकारण आणण्याचा प्रयत्न होत आहे. ही न्यायव्यवस्थेसाठी दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे. एखादा निर्णय पटला नाही म्हणून केवळ त्या निर्णयावर टीका केली जात नाही, तर थेट त्या न्यायमूर्तींच्या हेतूवरच शंका घेतली जाते, असे मत निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मांडले आहे.
न्यायालयाच्या कामकाजावर केल्या जाणाऱ्या राजकीय टीका-टिप्पणीच्या अनुषंगाने चंद्रचूड यांनी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केले. न्यायालयाच्या निर्णयावर मत व्यक्त केले जाऊ शकते. मात्र मनासारखा निर्णय झाला नाही म्हणून थेट न्यायदान करणाऱ्या न्यायमूर्तींच्या हेतूवर शंका घेणे, त्यांना नावे ठेवणे हे प्रकार चिंतेचा विषय आहेत. अशाप्रकारचे प्रकार वकिलांकडून होत आहेत हे फार दुर्दैवी आहे, असे चंद्रचूड यांनी आवर्जून नमूद केले. सगळेच वकील असे नाहीत, पण काही वकिलांकडून न्यायमूर्तींच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रकार घडतात, हे योग्य नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दिल्लीतील बहुचर्चित यशवंत वर्मा प्रकरणावर भाष्य केले. याबाबत चौकशीसाठी संसदेने समिती तयार केली आहे. या तपासात वर्मा यांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार प्रदान केला पाहिजे, मी 25 वर्षांपासून न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे. त्याआधी वकिलीही केली आहे. अनेकदा आपल्यासमोर जे येते, ते सत्य नसते. वास्तव त्यापेक्षा वेगळे असतं. सत्याचे अनेक पैलू असतात, ते कालांतराने समोर येतात. यशवंत वर्मा प्रकरणात समितीसमोर सत्य आले पाहिजे. नंतर ते समाजालाही कळले पाहिजे, असे मत चंद्रचूड यांनी मांडले.
लोकांच्या विश्वासाला तडा दिला जातोय!
न्यायदानाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये हे नेहमीच होत आहे. एखाद्या निर्णयाला पाठिंबा दिला जातो किंवा एखाद्या निर्णयावर टीका केली जाते, असे प्रकार नित्याचेच झाले आहेत, परंतु ज्या वेळी न्यायमूर्तींवर हेतू लादला जातो, त्या वेळी कुठेतरी न्यायव्यवस्थेवरील लोकांच्या विश्वासाला तडा देण्याचे काम केले जात आहे, असे चंद्रचूड यांनी म्हटले आहे.