
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने आज रत्नागिरी एस.टी. विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. गेली तीन वर्ष प्रलंबित असलेली निवृत्त कर्मचाऱ्यांची अंतिम देयके तातडीने अदा करा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने आज मुंबईत आझाद मैदान येथे मुख्य आंदोलन छेडण्यात आले. त्याचवेळी विभागीय पातळीवर आंदोलने करण्यात आली. रत्नागिरी एस.टी. विभागीय कार्यालयाबाहेर आज निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रलंबित मागण्यांचा पुनरूच्चार करण्यात आला. महाराष्ट्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन एस.टी. महामंडळाच्या धोरणामुळे गेली सहा वर्ष प्रलंबित आहे ती त्वरीत मिळावी.
एस.टी. महामंडळातील अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे केंद्र सरकारच्या नवीन पेन्शन योजनेत विलंब झाला आहे. वय वर्ष 59 ते 75 पर्यंतच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पती किंवा पत्नीसह सर्व बस गाड्यातून वर्षभर मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळावी. कामगार करारानुसार सेवानिवृत्तांसाठी दवाखाना उपल्बध करावा, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळावे, कामगार करारानुसार वैद्यकीय बिलाची पूर्तता करावी अशा मागण्यांचा समावेश आहे.
























































