परीक्षण – समग्र व्यक्तिमत्त्वाचे आकलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकांत आंब्रे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर जवळ जवळ शंभराहून अधिक चरित्रे अनेक भाषांमध्ये लिहिली गेली. मराठीतही त्यांची कमी नाही. तरीही त्यातील मोजकीच चरित्रे बऱयाच प्रमाणात ग्राहय़ (ऑथेंटिक) समजली जातात. त्यातही पुन्हा डावे-उजवे आहेत. अनेक चरित्रांमध्ये बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक घटना, प्रसंग वस्तुस्थितीनुसार आलेले नाहीत. काहींनी सत्याचा अपलाप केला आहे, तर काहींनी काही घटनांचे आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावून बाबासाहेबांविषयी गैरसमज होतील अशा तऱहेने आपल्या चष्म्यातून एकांगी पद्धतीने लिहिले आहे. प्रत्येक चरित्रात काही ना काही उणीव आहे. त्यातील काही प्रमुख चरित्रातील उणिवा दाखवत वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे दर्शविणारे पुस्तक मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक, कवी, दलित चळवळीचे अभ्यासक आणि अग्रणी तसेच आंबेडकरांच्या जीवनाविषयी इत्थंभूत जाणकारी असलेले लेखक ज. वि. पवार यांनी ‘बाबासाहेबांच्या चरित्रातील उणिवा’ हे पुस्तक लिहून पूर्वसुरींच्या चरित्रातील अनेक उणिवा दूर करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार काहींच्या चरित्रलेखात त्यांच्या गावाच्या नावापासून ते त्यांच्या अस्पृश्योद्धाराच्या चळवळीपर्यंत इत्थंभूत माहितीही नाही. कोणी त्यांना इतर राष्ट्रीय नेत्यांपेक्षा कमी लेखण्याची भूमिका घेतली आहे, तर कोणी त्यांचा मूळ हेतू समजावून न घेता पूर्वग्रहदूषितपणे टीका केली आहे. काहींनी हेतुपुरस्सर तर काहींनी आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार आपल्याला हवे तसे अर्थ काढून कल्पनाविलासाचा आधार घेत लिहिले आहे.

ज. वि. पवार यांच्या म्हणण्यानुसार आंबेडकरांचे आद्य चरित्रकार तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी त्यांचे पहिले चरित्र लिहिले, परंतु वयाच्या 26व्या वर्षीच त्यांचे निधन झाल्यामुळे बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान, कायदेमंत्री म्हणून त्यांची वाटचाल आणि त्यापुढील घटना अर्थातच त्यांच्या चरित्रात येऊ शकल्या नाहीत. बाबासाहेबांचे चरित्र लिहिताना ज्येष्ठ चरित्रकार धनंजय कीर यांनी सावरकरी चष्मा दूर केला नाही, हे अनेक उदाहरणांवरून दिसते. चां. भ. खैरमोडे यांनी बाबासाहेबांचे खंडात्मक चरित्र लिहिताच त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीचे केलेले दस्तऐवजीकरण पुढील पिढय़ांना मार्गदर्शक ठरेल असे आहे. मात्र त्यांचे व बाबासाहेबांचे पटत नसल्यामुळे त्यांचा परिणाम बाबासाहेबांविषयी गैरसमज पसरविणाऱया त्यांच्या लेखनातही झाला. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर अॅड. बी. सी. कांबळे यांनी ‘समग्र आंबेडकर चरित्र खंड’ मालिकेतील पहिला खंड 16 डिसेंबर 1984 ला प्रकाशित केला. त्यात बाबासाहेबांच्या मृत्यूचे कारण हा मुद्दा त्यांनी अखेरपर्यंत लढविला, पण त्या कमिशनबद्दल काय ते अनुत्तरितच राहिले.

मात्र, अनेक चरित्रकारांनी बाबासाहेबांच्या अंगभूत कर्तव्याकडे पाठ फिरवली. बाबासाहेब कला व क्रीडाप्रेमी होते. त्यांचे संगीत व चित्रकलेवरील प्रेम अनेकांनी नजरेआड केले. देश म्हणजे गांधी व गांधी म्हणजे देश हे समीकरण असताना त्यांनी गांधीजींना कसे नामोहरम केले, विशेषतः गोलमेज परिषदेत त्यांचे प्रस्फुलित झालेले पांडित्य, राजकीय, सामाजिक कहर विरोधक, विरोधातील प्रसारमाध्यमे, स्वकियांनाही समजावताना त्यांची मेटाकुटीला आलेली निर्णयक्षमता पिंवा त्यांनी मनुस्मृती समर्थकांची उडवलेली भंबेरी हिंदुस्थानी तरुणांच्या प्रकर्षाने नजरेत भरली असती.

मात्र लेखक ज. वि. पवार यांनी या पुस्तकात पूर्वसुरींच्या काही चरित्रकारांनी सोडलेल्या अनेक महत्त्वाच्या जागा भरून काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. त्यात बाबासाहेबांचे विद्यार्थीदशेतील लोकप्रतिनिधित्व, माणगावची परिषद, महाडच्या रणसंग्रामातील न्यायिक विजयाचे कारण, भारतीय संविधान सभेचा दडपलेला इतिहास, बाबासाहेबांच्या गुरुजनांचा शोध, आंबेडकर चळवळीतील ‘दादा’ मंडळींचा सहवास, शेकाफेची आपत्कालीन निर्मिती, बाबासाहेबांची सुरुवातीपासूनची बौद्ध धर्मीय मानसिकता, माता रमाईची जन्मतारीख आणि विवाहस्थळ, बाबासाहेबांचे वृत्तपत्रीय कर्तव्य, गांधीजींना दाखवण्यात आलेले काळे झेंडे, ‘जयभीम’चे प्रणेते आणि समर्थक, अशोकचक्रांकित ध्वज, संविधानातील तथागतांचे विचार व त्यांच्या खाणाखुणा, शेकाफेचे ‘हत्ती’ हे निवडणूक चिन्ह, असे कितीतरी विषय ज. वि. पवार यांनी हाताळले आहेत.
या पुस्तकात अनेक चरित्रांतून हुकलेल्या बाबासाहेबांच्या माहितीसह त्यांच्या आंबडवे गावातील राष्ट्रीय स्मारकापासून माईसाहेबांच्या त्यांच्या कार्यातील सहभागाविषयी अनेक महत्त्वाची माहिती आणि दुर्मिळ, कृष्णधवल छायाचित्रेही पाहावयास मिळतात. माहितीपूर्ण आणि आजपर्यंत उजेडात न आलेल्या बाबासाहेबांच्या अनेक गुणांची आणि कामांची नव्याने ओळख होते. हे केवळ आधीच्या चरित्रातील उणिवांचे पुस्तक न होता त्यातून बाबासाहेबांचे एक समग्र व्यक्तिमत्त्व साकार होते. संपूर्ण आंबेडकरांचे आकलन होण्यासाठी हे पुस्तक म्हणजे महत्त्वाचा दुवा आहे.

बाबासाहेबांच्या चरित्र लेखनातील उणिवा
लेखक : ज. वि. पवार
प्रकाशक : अस्मिता कम्युनिकेशन, मुंबई
पृष्ठे : 280, मूल्य : रुपये 300/-