‘आनंदी गोपाळ’- सामान्य जोडप्याचा असामान्य प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी पाटकर

इंग्रजांच्या राज्यात पारतंत्र्यात झाकोळलेल्या हिंदुस्थानाला शेकडो हातांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते फक्त राजकीय स्वातंत्र्य नव्हतं तर त्याहूनही अधिक सामाजिक स्वातंत्र्य होतं. त्यासाठी कित्येकांनी आपली आयुष्य वेचली. स्वतःच्या आयुष्याची होळी करून अनेक जाचक रुढी परंपरांच्या विळख्यात जखडलेल्या समाजाला नवीन युगाकडे चालवण्याचा भगीरथ प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणूनच अशी काही नावं हिंदुस्थानी इतिहासात अजरामर झाली. त्यांच्यामुळे हिंदुस्थान एका नव्या प्रगतीच्या वाटेकडे चालू लागला. यातली अनेक नावं, त्यांचा संघर्ष आजही आपल्यासाठी अज्ञात आहे. अशाच एका जोडप्याच्या अज्ञात लढ्याची कथा आनंदी गोपाळ हा चित्रपट सांगतो.

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी म्हणजे हिंदुस्थानातल्या पहिल्या स्त्री डॉक्टर. स्वातंत्र्यपूर्व काळात, 1886मध्ये जिथे पुरुषांनाही शिक्षण मिळणं अवघड, त्यावेळी त्या पार सातासमुद्रापार गेल्या आणि डॉक्टरची पदवी मिळवून आल्या. हा पराक्रम आपण सगळ्यांनी ऐकला असेल किंवा वाचला असेल. पण तो लढा नेमका कसा होता, त्यासाठी काय अग्निदिव्यं करावी लागली असतील, यापासून आपण अनभिज्ञ आहोत. या लढ्याचीच कथा आनंदी गोपाळमधून सांगण्यात आली आहे. मुळातच ही गोष्ट फक्त आनंदीबाईंची नाही, तर ती त्यांना खंबीर आणि अमूल्य साथ देणाऱ्या त्यांच्या पतीची- गोपाळरावांचीही आहे. मुलीला संपूर्ण शिक्षण घ्यावं लागेल ही तऱ्हेवाईक गोपाळरावांची एकमेव अट लहानग्या यमू नावाच्या मुलीचे आई-वडील नाईलाजाने मान्य करतात आणि तिचं लग्न 28 वर्षांच्या गोपाळरावांशी होतं. नऊ वर्षांची यमू गोपाळरावांची आनंदी होते. तिथपासून या जोडप्याचा विलक्षण आणि तितकाच विस्मयकारक प्रवास सुरू होतो. आधी जेमतेम अक्षरओळख असलेल्या आनंदीला शिकवण्याची गोपाळरावांची धडपड सुरू होते. प्रचंड सनातनी विचारांचा पगडा असलेले नातेवाईक, समाज घटक यांच्याशी दोन हात करून गोपाळराव आनंदीला शिकवतात. प्रसंगी धाक-दपटशा दाखवतात, पण तिला शिक्षण घ्यायची सक्ती करतात. त्याची किंमतही त्यांना पुरेपूर चुकवावी लागते. तरीही ते न डगमगता ते त्यांचा हेका कायम ठेवतात. पण, आनंदीबाईंना या सगळ्याचा जाच वाटत असतो. पतीच्या धाकापायी त्या शिकत असतात. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडते आणि त्यांचं आयुष्यच बदलून जातं. याच घटनेने आनंदीबाई स्वतःच डॉक्टरची पदवी घेण्याचा निर्णय घेतात आणि पतीच्या सोबतीने तो पूर्णत्वाला नेतात. अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आपल्या विचारांनी असामान्य जीवन जगणाऱ्या या जोडप्याची कथा चित्रपटात पाहावी अशी आहे.

या चित्रपटाची कथा अंजली कीर्तने यांच्या ‘काळ आणि कर्तृत्व’ या पुस्तकावर बेतली आहे. चित्रपटात 1875 ते 1886 असा काळ दाखवण्यात आला आहे. त्यामुळे अन्यायात खितपत पडलेला हिंदुस्थानी समाज आपल्याला इथे पदोपदी दिसतो. कर्मकांडाला प्रमाण मानून नवीन काहीही स्वीकारण्याची तयारी नसलेला समाज वेळोवेळी या जोडप्याच्या प्रवासात अडथळे उभे करतो. त्यांना मागे ओढायचा प्रयत्न करतो. तरीही जिद्दीने हे जोडपं कसं आपलं स्वप्न पूर्ण करतं हा प्रवास विलक्षण आहे. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने पडद्यावर मांडायचा प्रयत्न केला आहे. त्यांना चित्रपटातील कलाकारांनी अगदी उत्तम साथ दिली आहे. आनंदी आणि गोपाळ या प्रमुख भूमिकांमध्ये दिसणारे कलाकार भाग्यश्री मिलिंद आणि ललित प्रभाकर यांनी आपल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. गोपाळरावांचा तऱ्हेवाईकपणा, त्यांचे पुरोगामी विचार, त्यांची संतापी वृत्ती आणि तितकाच प्रेमळ स्वभाव, जिद्द, पत्नीला मोठं करण्याचा हट्ट, तिला मोठं झालेलं पाहून झालेला अभिमान हे सारं काही ललितने जीव ओतून साकारलं आहे. त्याच्या आजवरच्या भूमिकांना छेद देणारी ही भूमिका आहे, असंच म्हणावं लागेल. तीच गोष्ट आनंदीबाईंची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या भाग्यश्री मिलिंद या अभिनेत्रीची. आनंदीबाईंचं अवखळ बालपण, रुढींना चिकटून राहण्याची धडपड, परंपरा आणि आधुनिकतेत होणारी कुतरओढ, पतीच्या हट्टापायी खाल्लेले टक्के-टोणपे, आयुष्यात घडलेल्या वाईट प्रसंगामुळे उद्ध्वस्त होणं आणि त्यातूनच जिद्दीने पेटून उठणं असा भूमिकेचा विलक्षण प्रवास भाग्यश्रीने उत्तम वठवला आहे. त्यांना इतर कलाकारांनीही चांगली साथ दिली आहे. विशेष कौतुक, गीतांजली कुलकर्णी यांच्या भूमिकेचं. गोपाळरावांच्या पहिल्या पत्नीची आई गीतांजली यांनी साकारली आहे. सुरुवातीला जावयाच्या आधुनिकतेशी फारसं सोयरसुतक नसलेली आणि हळूहळू स्त्रीशिक्षणाच्या हट्टाचं महत्त्व कळून चुकलेली विधवा स्त्री त्यांनी उत्कृष्टरित्या साकारली आहे.

पाहा आनंदी गोपाळचा ट्रेलर-

कथेची बांधणी उत्तम असल्याने चित्रपट कुठेही सैल पडत नाही. अध्ये-मध्ये चित्रपटाची गती थोडी संथ होते, तरीही प्रेक्षक या कथेत गुंग होऊन जातो, त्यासाठी पटकथाकारांचं विशेष अभिनंदन. तीच गोष्ट संवादांची. इरावती कर्णिक यांचे संवाद अतिशय समर्पक असून काळाशी सुसंगत आहेत. त्यामुळे प्रेक्षकाला तो काळ समजून घ्यायला मदत होते. इतर तांत्रिक बाजू चोख आहेत. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी हा विलक्षण प्रवास आपल्या परीने दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि ते त्यात यशस्वीही झाले आहेत. चित्रपट पाहताना आजच्या काळात अतिशय सहज मिळणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी पूर्वीच्या काळी मिळणं किती दुष्प्राप्य असू शकेल, याची पूरेपूर कल्पना आपल्याला येते आणि तिथेच दिग्दर्शक यशस्वी होतो. पण, मध्यंतरानंतर आनंदीबाईंचा अमेरिकेतील वास्तव्याचा भाग अजून सविस्तरपणे आला असता तर हा चित्रपट आणखी परिणामकारक ठरला असता, असं वाटून जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आनंदीबाईंचा दुर्दैवी मृत्यू अतिशय संयत मांडणीने दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट वेगळा ठरतो.

या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग म्हणजे संगीत. या चित्रपटाला हृषिकेश-सौरभ-जसराज यांचं संगीत लाभलं आहे. या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती गीतकार वैभव जोशी यांनी लिहिली आहेत. याचा विशेष उल्लेख करायचं कारण म्हणजे बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटात अतिशय उत्तम गाणी ऐकायला मिळाली आहेत. त्यांना जसराज जोशी, आनंदी जोशी, प्रियांका बर्वे, हृषिकेश रानडे, रोहित राऊत, शरयू दाते अशा तरुण गायकांनी आवाज दिले आहेत. यांनी गायलेली ‘रंग माळियेला’, ‘आनंदघना’, ‘माझे माये माऊली’, ‘वाटा वाटा’ आणि स्त्री शक्तीला समर्पित असलेलं ‘तू आहेस ना’ ही पाचही गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. चित्रपटानंतरही ती विशेष लक्षात राहतात.

थोडक्यात, आनंदी गोपाळ पाहिल्यानंतर एक चांगला चरित्रपट पाहिल्याचं समाधान प्रेक्षकाला लाभतं. जेव्हा समाज कर्मकांड, अंधश्रद्धा यांच्यात जखडलेला होता, तेव्हा म्हणजे 132 वर्षांपूर्वी एका सामान्य महिलेने अफाट पराक्रम गाजवत आपलं नाव इतिहासात अमर करून टाकलं. तिला तिच्या जोडीदाराने यात अविरत साथ दिली. या सामान्य जोडप्याच्या असामान्य धाडसाची ही गोष्ट पाहून आपण कृतकृत्य होतो. कारण, प्रचंड टोकाचा विरोध होऊनही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. म्हणूनच त्यांच्यासारख्या अनेकांना प्रगतीची दारं खुली झाली. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं प्रचंड साहस आनंदी-गोपाळमध्ये होतं आणि ते साहस पुढच्या अनेक पिढ्यांसाठी वंदनीय आणि अनुकरणीय राहील.