अमानुषतेच्या प्रतिबिंबाची कविता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मल्लिका अमरशेख

‘अंतर्वेध’ – प्रियदर्शन बंडेलू यांचा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला. कवितेचा विषय त्यातल्या कविता, शैली, चित्रं, मुखपृष्ठ सगळंच आगळंवेगळं.

‘साहित्य हा समाजाचा आरसा’ असं एक गुळगुळीत वाक्य आहे. तर इथं या कविताच आरसा झाल्यात आणि या कवितेतलं आपलं म्हणजे पूर्ण मानवाचं, पूर्ण समाजाचं प्रतिबिंब हे अमानुष, विकृत न् भयचकित करणारं आहे न् हे प्रतिबिंब अत्यंत स्पष्ट परखडपणे आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कवीनं एका आगळय़ा रूपकाकरवी दाखवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन व स्वागत! अर्थात प्रियदर्शन बंडेलू हे चळवळीतले सक्रिय नेते असल्यामुळे हाडाचा कार्यकर्ता जसं निष्ठsने कट्टरपणे ‘नाहीरे’ वर्गाची बाजू घेतो त्याचप्रमाणे त्यांच्या कविता, त्यांचे शब्द हे श्रमिक कामगारवर्गाची नुसतीच बाजू नाही तर शब्द जणू तलवार परजत लढतात.

यातलं माकडाचं रूपक अतिशय मार्मिक आहे. आपले पूर्वज आपल्याला स्वतःचं वास्तववादी रूप दाखवतय ही कल्पनाच भन्नाट न् चपखल आहे. माकडाचा माणूस झाला, पण माणसाचे माकड न होता तो प्रगत होता होता विकृत पण झाला. पशू, जनावर हा शब्द आपण हीनतेसाठी वापरतो न् पशूंना दुय्यम समजतो, पण आपल्यातले खूप मानव त्या पशूहून क्रूरपणे वागतात आणि हा चाबूकमार आपला पूर्वजच आपल्याला देऊ शकतो हे संयुक्तिकच आहे. जनावर भूक लागेल तेव्हाच हत्या करतात. आपल्याला फक्त हत्येची, हिंसेची भूक लागते.

जनावर अन्न साठवून ठेवत नाही. आपण अन्न, पैसा, जमीन, प्रकाश, पाणी सगळे साठवतो. जनावरं पिलांना जन्म देतात, पण पिल्लू हा आपला ऍसेट समजत नाही व त्यापासून फायदाही घेत नाही. आपल्याला मुलगाच हवा असतो न् तोही डॉक्टर, इंजिनीयरच व्हायला हवा असतो. जनावर जंगले जपतात. आपण डोंगर कुरतडतो. वाळू चोरतो, झाडांची कत्तल करतो. लवकरात लवकर सगळे कसे पटापट नष्ट करता येईल यासाठी शोध लावतो.

अंतर्वेध
लेखक – प्रियदर्शन बंडेलु
प्रकाशन – दलित श्रमिक प्रकाशन
मूल्य -८० रुपये, पृष्ठs – ७३