शेतकरी जीवनाचं अरण्यरुदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र जाधव

या मातीच्या उदरात, कविता उगते माझी
या मातीच्या पाल्हाळात, कविता जगते माझी

या कवितासंग्रहातील सुरुवातीच्या या ओळींमधूनच कवी सखाराम डाखोरे यांनी मातीशी आणि निसर्गाशी एक नातं जोडलं आहे. या कवितासंग्रहातल्या पुढच्या प्रत्येक कवितेतून कवीचं मातीशी असलेलं हेच इमान पदोपदी दिसून येतं. शेतकऱयांच्या उरातला वणवा आणि त्यांच्या शोकात्म जीवनाची धगधगती आग कवी सखाराम डाखोरे यांनी आपल्या ‘रानवा’ या कवितासंग्रहातून शब्दबद्ध केली आहे. जग कितीही विज्ञान-तंत्रज्ञानाने पुढे गेलं असलं तरी शेतकऱयाचं दुःख तसूभरही कमी झालेलं नाही याची जाणीव हा कवितासंग्रह वाचून होते.

मातीत पीक पेरलं तरी अपुऱया पावसामुळे रखरखीत झालेल्या जमिनीवर पीक पिकत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहेच, शिवाय वर्षानुवर्षे या नापिकीमुळे त्याच्या हालअपेष्टांमध्ये जीवन जगावे लागत आहे.

किडलेल्या कणसावाणी
मन त्याचं किडलं होतं
झडलेल्या झाडावानी
शरीरही झडलं होतं

अशा ओळींमधून कवी सखाराम डाखोरे यांनी शेतकऱयांचं हलाखीचं जीवन आर्ततेनं मांडलं आहे. ‘रानवा’ या काव्यसंग्रहातील अधिक कविता हेच दुःख तळमळीने आपल्यापर्यंत पोहोचवतात, परंतु या दुःखाची पार्श्वभूमी जरी सारखी असली तरी त्यामध्ये एकसुरीपणा न आणण्याचं भान कवीनं राखलं आहे.
खूप जण गावाहून शहराकडे राहण्यास आले आहेत. यात विशेषतः शेतकऱयांची मुलं अधिक असतात. कामासाठी अन् पैशांसाठी गावाहून शहरात स्थलांतर होत असलं तरी त्यांची नाळ मात्र गावाशी जोडलेली असते.

इथली वाट चालताना आठवण येते गावाची
काटय़ाकुटय़ातून चालणाऱया बहिणीची अन् भावाची

अशा ओळींमधून कवीने शहरात असणाऱया माणसांना गावी राहणाऱया आपल्या कुटुंबाची, सग्यासोयऱयांची आठवण प्रत्येक क्षणाला सतावत असल्याचं चित्र उभं केलं आहे. गाव जरी मागे राहिलं तरी आईची माया आणि घराची ओढ या कवितांमधून कवी सखाराम डाखोरे यांनी मांडली आहे. त्याचबरोबर शेतकऱयांचं विठ्ठलाशी अन् संतांशी असलेलं भक्तिभावाचं नातं काही कवितांमधून दिसून येतं.

शेतकरी जीवनाची दारुण अवस्था व्यक्त करणारे कवी ‘रानवा’ कवितासंग्रहाच्या अखेरीस प्रेम आणि प्रेमातील विरह याचे वर्णन करणाऱया काही कविता समाविष्ट करतात.

कसं डोंगर झाडीत पीक रानात डुलतं
जव्हा दिसते साजणी मव्ह काळीज फुलतं

यांसारख्या ओळींमधून कवी प्रेमाची एक वेगळी परिभाषा रेखाटतात. तसेच

तुझ्या सोहळ्याचा थाट
तुझा सरलेला घाट
आता चालतात पाय माझी एकटय़ाची वाट

या ओळींमधून प्रेमामधला विरह तितक्याच उत्कटतेने कवी आपल्यापर्यंत पोहोचवतात. जिच्यावर प्रेम केलं ती आता दुसऱयाची झाली याची सल या कवितांमधून जाणवते.

कवी सखाराम डाखोरे यांच्याकडे असलेली शब्दसंपदा आणि गावरान भाषेचं अनोखं सौंदर्य हे या कवितासंग्रहाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. कवी स्वतः शेतकरी कुटुंबाचा एक भाग असल्याने त्यांच्या कवितेला वास्तवाचा पदर आहे. यातील प्रत्येक कवितेला गाण्याची एक लय आहे. साध्यासुध्या शब्दांतून या कविता वाचकांच्या हृदयास भिडवण्यास कवी निश्चितच यशस्वी झाले आहेत. पुस्तकाचं मुखपृष्ठसुद्धा आकर्षक आहे. शेतकरी जीवनाचं अस्वस्थ जग अनुभवण्यासाठी आणि ग्रामीण संस्कृतीचा अनोखा प्रत्यय घेण्यासाठी ‘रानवा’ या काव्यसंग्रहाचा आवर्जून आस्वाद घ्यावा.

देवेंद्र जाधव
रानवा (काव्यसंग्रह)
लेखक – सखाराम डाखोरे
प्रकाशक – डिंपल पब्लिकेशन
पृष्ठs – 112 रुपये, मूल्यः 150