अभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती

>> अस्मिता प्रदीप येंडे

बालपण, तारुण्य, वृद्धत्व असे मानवी जीवनाचे विविध स्तर आहेत. जन्माला आलेला प्रत्येक जण या क्रमाने मार्गक्रमण करत असतो. सुरुवातीच्या धकधकीच्या आयुष्यात माणूस नोकरी, घर-संसार, जबाबदाऱया यात गुंतलेला असतो. रोजचा दिनक्रम पाळत जगत असतो. आपल्या सर्व जबाबदाऱया पार पाडल्यानंतर वयाच्या ठरावीक टप्प्यावर जाणीव होते ‘ज्येष्ठत्वाची’… सुरुवातीचा काळ इतरांसाठी जगण्यात जातो. काळ थांबत नाही. तो पुढे जात राहतो. वयाचा हा टप्पा स्वतःसाठी काही करण्याची, स्वतःला आनंद मिळवून देण्याची जाणीव करून देत असतो. प्रत्येक मनुष्याला या टप्प्यातून जायचे आहे.

वय हा फक्त आकडा असतो. मनाला वयाचे बंधन नसते. फक्त वयाने ज्येष्ठत्व प्राप्त झाले असे नाही. विचारांची प्रगल्भता, सतत काहीतरी करण्याची, नवीन शिकण्याची धडपड तुम्हाला विचारांनी ज्येष्ठ बनवतात. सेकंड इनिंग म्हणजे जीवनाची नवी-कोरी आवृत्ती याची प्रचीती देणारे पुस्तक म्हणजे ‘सेकंड इनिंग’. लेखिका कुमुदिनी बल्लाळ यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे मनाला नवी ऊर्जा देणारे आहे. शारदा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे.

लेखिका कुमुदिनी बल्लाळ यांनी दैनिक ‘ठाणे वैभव’मध्ये ‘सेकंड इनिंग’ या सदरातून अनेक अशा व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून दिला, जे आपल्या वयाच्या या टप्प्यातही उत्स्फूर्तपणे कार्य करीत आहेत. काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत, कोणी समाजाप्रति आपले कर्तव्य पार पाडत आहेत. कोणी कलाकुसर करत आहेत. कुणी आपले छंद जोपासत आहेत. अशा व्यक्तींचा शोध घेऊन, त्यांच्या मुलाखती घेऊन एक वेगळं सदर कुमुदिनी बल्लाळ यांनी लिहिलं आणि त्या मुलाखतींचा संच पुस्तक रूपात वाचकांसाठी उपलब्ध झालाय. विशेष म्हणजे लेखिका स्वतः ज्येष्ठ असून आपला वेळ प्रेरक व्यक्तिमत्त्वं समाजासमोर यावीत यासाठी सत्कारणी लावत आहेत हेच किती प्रेरणादायी आहे. असा उत्साह पाहून इतरांना का जगण्याचा उत्साह येणार नाही?

‘सेकंड इनिंग’ या पुस्तकात 50 मुलाखतींचा समावेश आहे. या मुलाखती वाचताना जाणवते, अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करत आहेत, ज्यांचे कार्य लोकांसमोर आले नाही. अशा प्रेरणादायी, चैतन्यपूर्ण व्यक्तिमत्त्वांना प्रकाशात आणण्याचे काम आपल्या लेखणीतून लेखिकेने केले आहे.

सुरुवातीचा धावपळीचा काळ संपवून स्वतःचा आनंद शोधता शोधता इतरांना कशी मदत होईल, सहाय्य होईल यादृष्टीने अनेक ज्येष्ठ नागरिक कार्य करताना दिसतात. हे वय असे असते जिथे आपल्या माणसांची सोबत हवी असते, एकटेपणा नको असतो. त्यामुळे आपल्याच वयाच्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यात आनंद मिळतो. ज्येष्ठत्व आलं म्हणजे अनेक व्याधीसुद्धा जडतात. डोळ्यांनी कमी दिसायला लागतं. कमी ऐकू येतं किंवा पाय दुखणं इत्यादी… पण तरीही या सगळ्या व्याधीवर मात करत अनेक ज्येष्ठ नागरिक आपले छंद जोपसताना दिसतात, विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात. वय झालं म्हणून किंवा जीवनात अनेक अडचणी असल्या तरी जिद्दीने जगण्याची ऊर्जा, सकारात्मक दृष्टी देणारे ‘सेकंड इनिंग’ हे पुस्तक वाचनीय आहे. आनंद हा छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमध्ये दडलेला असतो, तो शोधावा लागतो. दुःख आपोआप होतं, आनंद शोधावा लागतो. ज्येष्ठत्व हे दुसरे बालपण असते, ते तसेच जगायला हवे.

लेखिका कुमुदिनी बल्लाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे की, या लेखनात त्यांना निखिल बल्लाळ म्हणजेच त्यांचा नातू यांच्यामुळे प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. लेखिकेचा आणि या पुस्तकात ज्यांच्या मुलाखती आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तरुणाईला लाजवेल असाच आहे. ज्येष्ठ नागरिकांनी पिंपळपानासारखे जगायला शिकले पाहिजे. कारण जाळी झाली तरी आयुष्याच्या पुस्तकात आपले अस्तित्व इतरांनी पिंपळपानासारखे जपून ठेवले पाहिजे, ही ओळ सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी पुरेशी आहे. ही सेकंड इनिंग नक्की अनुभवा!

सेकंड इनिंग
लेखिका : कुमुदिनी बल्लाळ
प्रकाशक : शारदा प्रकाशन
मूल्य: रुपये 100/-

आपली प्रतिक्रिया द्या