मुंबई based वैचारिकता

268

>> क्षितीज झारापकर

672 रुपयांचा सवाल. मुंबईच्या अशा खास तिच्या समस्या असतात. यावर बेतलेले तरुणाईचे नाटक.

कोणत्याही क्षेत्रात नवीन पदार्पण करणाऱया व्यक्ती पहिल्याच वेळी यशस्वी होऊन नावारूपाला येत नाहीत. जगात सगळीकडे सचोटी, मेहनत अणि दृढ निश्चयच कामी येतो. मराठी नाटय़क्षेत्र काही वेगळं नाही. नवीन रंगकर्मींना इथेही गोष्टी गाठीशी घेऊन कार्यरत रहावं लागतं. सुरुवातीच्या काळात वरील नमूद सर्व व्यक्तींकडून चुका झाल्या, पण त्यापासून शिकून स्वतःला वृद्धिंगत करत ही सर्व मंडळी मोठी झाली. सुरुवातीच्या त्यांच्या चुका जाणवल्या, पण त्यापेक्षा जास्त दिसला तो त्यांचा दृढ निश्चय. परवाच असा सचोटी, मेहनत आणि निश्चयाचा कलात्मक अनुभव घेण्याचा योग जुळून आला. निमित्त होतं ते स्वभाव कल्याण या संस्थेने सादर केलेलं ‘672 रुपयांचा सवाल’ हे नाटक.

‘672 रुपयांचा सवाल’ हे जयंत पवार यांच्या कथेवरून बेतलेलं नाटक. सुरुवातीलाच नमूद करायला हवं की, ‘672 रुपयांचा सवाल’ या नाटकाने कोकण करंडक जिंकला आहे आणि गेल्या झी नाटय़ गौरव पुरस्कारामध्ये तब्बल पाच पारितोषिके मिळालेली आहेत. पण या सगळय़ा बाहुल्यांमुळे ‘672 रुपयांचा सवाल’ हे उच्च दर्जाचं सिद्ध होत नाही तर ते एक उत्तम नाटक आहे म्हणूनही शाबासकी या नाटकाला मिळालेली आहे. नाटक चांगलं असायला मुळात कथानक चांगलं लागतं. जयंत पवारांची ही कथा अतिशय व्यापक आहे. लोअर परेलचं अपर वरळी झाल्याची ही कथा आहे. या धर्तीवर असंख्य चित्रपट आणि नाटकं झाली आहेत. तरीही ‘672 रुपयांचा सवाल’ वेगळ आहे. कारण यातला संघर्ष वेगळा आहे. नवश्रीमंत बौद्धिक (neo-rich pseudo intellectuals) आणि प्रस्थापित वंचित (established deprived) यांच्यातला हा संघर्ष आहे. शहरातल्या एका भागात उभा राहिलेला एक टॉवर आणि त्या समोरची झोपडपट्टी यांच्यातले मतभेद हा या कथानकाचा गाभा आहे. एका महिन्याच्या एका घराच्या दुधाच्या बिलाच्या 672 रुपयांवरून वाद सुरू होतो. या वादात मग ऑव्हरवर्कड पोलीस यंत्रणा जी क्षुल्लक वाटणाऱया केसमध्ये कसे नेहमीचे आरोपी पकडते, त्यांना स्थानिक नेते कसे हतबल करतात, पांढरपेशा घरात कशी वैचारिक कन्फ्युजन असते, स्वतःचा एक मुलगा चांगल्या कॉलेजातून पदवीधर झाल्यावरही स्वतःला वंचित समजणाऱयांची वेगळी वैचारिक तारांबळ कशी असते, शुद्ध बुद्धिजीवी भौगोलिक सत्यतेच्या अभावामुळे कसे नपुंसक ठरतात अशा सगळय़ा विविध छटा जयंत पवार कथेतून मांडून जातात. त्यामुळे या नाटकाची कथा किती व्यापक आहे याचा अंदाज येतो. पण मूळ कथा न वाचता केवळ ‘672 रुपयांचा सवाल’ं हे नाटक पाहून जर मला एक सामान्य प्रेक्षक म्हणून हे कळलं तर जयंत पवारांच्या या कथेचं नाटय़रूपांतर करणाऱया स्वप्नील आजगावकर या तरुण रंगकर्मी लेखक दिग्दर्शकाचं खरोखर कौतुक करायला हवं. स्वप्नीलने कथेतील सर्व बारकावे नेमकेपणाने टिपत ‘672 रुपयांचा सवाल’ हे नाटक लिहिलेलं आहे.

स्वप्नील आजगावकर याने केवळ पवारांच्या कथेचं नाटक नाही केलेलं. त्याने त्या कथेतील पात्र प्रामाणिकपणे उभी केली आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. लेखन प्रक्रियेत कथानकाच्या भव्यतेत गुंतून पात्र उभारणीकडे दुर्लक्ष झालेलं बऱयाचदा दिसून येतं. ‘672 रुपयांचा सवाल’मध्ये मात्र तसं झालेलं नाही. प्रत्येक छोटय़ातलं छोटं पात्रदेखील इथे ठाशीव आहे. हे श्रेय अर्थात लेखकाबरोबराच स्वप्नील आजगावकर व नितीन सावले या दिग्दर्शक द्वयीचं आहे. दोघांनी अतिशय कल्पकतेने ‘672 रुपयांचा सवाल’ची उभारणी केलेली आहे. वेगवेगळय़ा पातळय़ांवर खूप घटना या नाटकात घडतात आणि त्या तितक्याच जास्त ठिकाणी घडतात. हे सगळं रंगमंचावर केवळ नेपथ्य आणि प्रॉप्सच्या मदतीने या दोन दिग्दर्शकांनी मांडलंय आणि ते खूप परिणामकारक झालं आहे. राजेश शिंदेंची प्रकाश योजना आणि श्रीधर मेनन व सूरज जाधवचं संगीत या परिणामकारकतेत भर घालते.

‘672 रुपयांचा सवाल’ हे नाटक सांघिक नाटक आहे. स्वभाव कल्याणची संपूर्ण टीम हे नाटक सादर करते. सगळेच अत्यंत मनापासून काम करतात. अशा संस्था आणि त्यांच्या या अशा टीम्स आहेत म्हणून मराठी रंगभूमी सबळ हातात आहे हा विश्वास कायम राहतो. तरीही ‘672 रुपयांचा सवाल’मधल्या मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अत्यंत गुणी आहेत. रिपोर्टर आणि टिचर म्हणून स्वप्नील आजगावकर आणि मधुर म्हात्रे अपेक्षित ऊर्जा देतात. जयप्रकाश मिश्रा भाऊंच्या भूमिकेत तर चंद्रास कांबळे बळी जंगमच्या भूमिकेत फक्त शोभत नाहीत तर हे दोघे ती पात्रं जिवंत करतात. भावेश कुंटला नेत्याचा उन्मत्तपणा आणि लाचारी दोन्ही खूप छान वठवतो तर प्रसाद मुसळे पोलीस इन्स्पेक्टरचा तोरा, समंजसपणा आणि हतबलता सहजतेने अधोरेखित करतो. अलका बोटे आणि तन्वी सुर्वे या दोघींनी दोन थरातल्या घरातल्या बायका कमालीच्या खऱया वाटाव्यात अशा साकारल्या आहेत. सुदाम शेलार आणि दिव्येश म्हात्रे यांनी त्या घरातली मुलं व्यवस्थितपणे रंगवली आहेत. जिमिशा तन्ना हिने नवश्रीमंत घरातली सून पुरेशी स्नॉबीश केलेली आहे. प्रतीक पाटील यांचा बुद्धिजीवी भांडारकर लक्षात राहतो. याव्यतिरिक्त टॉवर आणि झोपडपट्टीतील असंख्य शेजारी, हवालदार वगैरे पात्र येतात त्या प्रसंगात भाव खाऊन जातात. परिणामी ‘672 रुपयांचा सवाल’ हे नाटक सगळे मिळून ताकदीने उभं करतात. एका हौशी नाटय़संस्थेचं प्रायोगिक नाटक 20 प्रयोगांची प्रयोगसंख्या गाठतं यातच या सगळय़ा होतकरू रंगकर्मींच्या एकजुटीचं यश आहे. ‘672 रुपयांचा सवाल’ म्हणूनच यंदाचं एक लाक्षणिक नाटक आहे.

नाटक – 672 रुपयांचा सवाल
निर्मिती – स्वभाव, कल्याण
मूळकथा – जयंत पवार
प्रकाश – राजेश शिंदे
संगीत – श्रीधर मेनन, सूरज जाधव
नृत्य – प्रथमेश जोगळेकर
वेशभूषा – दिव्येश म्हात्रे, सदानंद बडक
रंगभूषा – भावेश कुंटला, तन्वी सुर्वे
लेखक-दिग्दर्शक – स्वप्नील आजगावकर, नितीन सावळे
कलाकार – मधुर म्हात्रे, जिमिशा तन्ना, भानू जगदाळे, स्वप्नील आजगावकर
दर्जा – तीन स्टार

आपली प्रतिक्रिया द्या