दे दे प्यार दे : करमणुकीचा त्रिकोण

244

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

प्रेम, कौटुंबिक नाट्य, विनोद, रंगीबेरंगी वातावरण, गडबड गोंधळ आणि चांगले कलाकार असा सरंजाम असलेले सिनेमे करमणुकीच्या दुष्टीने सुरक्षित असतात. म्हणजे यात खूप काही भारदस्त नसलं तरीही दोन-अडीच तास तसे चांगले जातात. ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमादेखील असाच आहे…हलकाफुलका, रंगीबेरंगी आणि सुखद.

लंडनमध्ये राहणार्‍या, श्रीमंत अशा पन्नास वर्षांच्या माणसाच्या आयुष्यात एक निम्म्या वयाची तरुण मुलगी येते. ती तशी मोकळ्याढाकळ्या स्वभावाची, मॉडर्न विचारसरणीची, तर त्याचा घटस्फोट झालाय, दोन मोठी मुलं आहेत, पण तरीही पहिल्या शारीरिक आकर्षणाचा भाग सरल्यावर प्रेमात पडतात आणि तिला लग्न करावं असं वाटायला लागतं. पहिल्यांदा तो तयार नसतो, पण शेवटी मान्य करतो. लग्न करायच्या आधी आपण एकदा आपल्या हिंदुस्थानमधल्या कुटुंबाला भेटावं असे तो सुचवतो आणि दोघेजण हिंदुस्थानात येतात. तिथे बायको, दोन मोठी मुलं, आई-वडील या गोतावळ्यात काय काय धमाल उडते, त्याच्या तरुण गर्लफ्रेंडला बघून घरचे काय प्रतिक्रिया देतात, या सगळ्यांना परत भेटल्यावर काय होतं, लग्न होतं की पूर्वीच्या आयुष्यात तो पुन्हा जातो या सगळ्यातून उडालेली गंमत म्हणजे ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा.

हा सिनेमा काही खूप वेगळा किंवा मास्टरपीस म्हणावा असा नाही, पण विनोदी सिनेमांच्या नावाखाली ज्या काही थिल्लर, द्वर्थी फुटकळपणा दाखवला जातो, त्यापेक्षा हा सिनेमा नक्कीच उजवा आहे. एक चांगला तरीही वेगळा विनोदी कौटुंबिक पट म्हणून या सिनेमाकडे नक्कीच पाहता येईल.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिचा अभिनय छान आहे. तिचा पडद्यावरचा वावर नक्कीच सुखद आहे. तसंच वागण्यातला मोकळेपणा, ग्लॅमरस लूक, सहज निभावण्याची ताकद आणि अभिनयाची समजदेखील बर्‍यापैकी जमून आली आहे. पडद्यावर अजय देवगण आणि तब्बू ही जोडी प्रेक्षकाला नेहमीच पाहायला आवडते. तब्बूचा सहजपणे असलेला वावर आणि अजय देवगण पन्नास वर्षांचा असूनही त्याच्यात तरुण मुलीला प्रेमात पडायला असणारी खासीयत छान उभी राहिली आहे. जिमी शेरगील हा अभिनेता चांगला असला तरी या सिनेमात तो गेल्या पाचदहा सिनेमांत असतो तसाच दिसला आहे. नावीन्य नाही तसंच त्याच्या व्यक्तिरेखेची लांबीदेखील अगदीच कमी आहे. बाकीच्या कलाकारांचंही तसंच. हा सिनेमा फक्त या तिघांवर ती आहे हे डोळ्यांसमोर ठेवून जो काही सिनेमा रचला आहे तो या तिघांभोवतीच फिरतो.

सिनेमाची कथा चांगली आहे. त्यात साचेबद्धपणातून बाहेर पडण्याची क्षमताही आहे. पटकथा लिहिताना ती आणखी खुलवता आली असती तर कथेची लज्जत वाढली असती. संवाद चांगले आहेत. विशेष म्हणजे तब्बू आणि रकुल यांच्यातली जुगलबंदी गंमत आणते. हिंदुस्थानातलं सौंदर्य आणि लंडनची चमक धमक हेदेखील सिनेमाच्या पार्श्वभूमीवर सुखद अनुभव देत राहतात. रंगीबेरंगी प्रेमकथा बघ सुंदर पार्श्वभूमीच्या सातत्यामुळे प्रेक्षकांना छान वाटत राहतं. गाणी विशेष नाहीत. अशा प्रकारच्या सिनेमात दोन-तीन गाणी भरावी लागतात म्हणून भरल्यासारखी दिसतात. मध्यांतरात एका सरळ रेषेत सुरू असणारा हा सिनेमा तितका काही वेगळेपणाकडे जात नाही. मध्यांतरानंतर मात्र बर्‍यापैकी पकड घट्ट होते. कदाचित मध्यांतरानंतर तब्बू आल्यामुळे सिनेमा रुचकर होतो. अर्थात पहिला अर्धा भाग तसा छोटा असल्यामुळे कंटाळा येत नाही. एकूणच हा सिनेमा एका वेळेस बघण्यासाठी बरा पर्याय आहे. मोठय़ा पडद्यावर सिनेमा पाहायची आवड असणाऱयांना हा सिनेमा निराश नक्कीच करणार नाही, पण छोटय़ा पडद्यावर आल्यावर बघितला तरीही काही विशेष फरक पडणार नाही.

सिनेमादे दे प्यार दे

दर्जा -**1/2

निर्माताभूषण कुमार, किशन कुमार, लव रंजन, अंकुर गर्ग

दिग्दर्शकअकिव अली

लेखकलव रंजन, तरुण जैन, सुरभी भटनागर

कलाकारअजय देवगण, तब्बू, रकुल प्रीत सिंग, जावेद जाफरी, जिमी शेरगील

आपली प्रतिक्रिया द्या