
>> क्षितिज झारापकर
‘कोपनहेगन’ मराठी रंगभूमीवरील एक आगळा प्रयोग. दुसर्या महायुद्धाच्या काळात भौतिकशास्त्राचे दोन शास्त्रज्ञ भेटतात… आणि त्या भेटीत काय होतं…
दुसर्या महायुद्धावर हिंदुस्थानी कलादालनात फारसं कधीच काही आलेलं नाही. आपलं कलाविश्व खूपसं भावनिक कल्लोळात गुंतलेलं आहे. मग शास्त्रज्ञ आणि त्यांच्या वैज्ञानिक गुंत्यावरचं नाटक वगैरे म्हणजे जरा लांबचाच पल्ला झाला. आपल्याला अब्दुल कलाम शास्त्रज्ञ होते याचा सार्थ अभिमान त्यांना राष्ट्रपतीपद मिळाल्यावर वाटू लागला. आजही बहुसंख्य हिंदुस्थानींना विक्रम साराभाई कोण हा प्रश्न पेचात टाकू शकेल. तरीही कोल्हापूरच्या एका प्रायोगिक नाट्यसंस्थेने एक असं नाटक मराठी रंगभूमीवर आणलंय जे दुसर्या महायुद्धाच्या काळात बेतलंय आणि नाटकाचा विषय तत्कालीन थियोरेटीकल फिजिक्स आणि अनसर्टन्टी प्रिन्सिपल हा आहे. हे नाटक 1941 साली घडलेल्या दोन शास्त्रज्ञांच्या एका भेटीवर आधारित आहे. या भेटीमुळे पुढे जगाचं भवितव्य घडलं. त्या भेटीत नेमकं काय घडलं, हे आजतागायत कुणालाच माहीत नाही. त्या दोन शास्त्रज्ञांनी ते जगाला कधीच सांगितलं नाही. या नाटकात मात्र त्या भेटीच्या अनेक पॉसिबलिटीज मांडण्याचा प्रयत्न आहे. हे एका इंग्रजी नाटकाचं रूपांतर आहे. मायकल फ्रायन या नाटककाराचं ‘कोपनहेगन’ हे ते नाटक. ‘कोपनहेगन’ हे मराठीत भाषांतरित नाटक कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ या संस्थेने सादर केलंय.
निल्स बोर्ह हा डेनमार्कचा अणुविज्ञानातील अग्रगण्य एक शास्त्रज्ञ. नोबेल पुरस्काराने सन्मानित होऊन तो जगातला अग्रगण्य फिजिसिस्ट झाला. ऍटमचा शोध निल्स बोर्हचा. वर्नर हायसनबर्ग हा त्याचा विद्यार्थी. दोघांनी तीन-चार वर्ष फिजिक्स या विषयावर एकत्रितपणे काम केलं. पुढे हायसनबर्ग जर्मनीला परतला आणि दुसर्या महायुद्धाच्या वेळी जर्मन अणूसंशोधनाचा सर्वेसर्वा झाला. डेनमार्कवर जर्मनीने कब्जा केल्यावर बोर्ह अमेरिकेला गेला व लॉस एलॅमोस रिसर्च लॅबमध्ये कार्यरत होता, जेथे हिरोशिमा व नागासाकीवर टाकण्यात आलेले अणुबॉम्ब तयार केले गेले. पण बोर्ह जाण्याआधी घडलेली दोघांची भेट जागतिक इतिहासात एक प्रश्नचिन्ह बनून आजही उभी आहे. ‘कोपनहेगन’ हे त्या भेटीचं नाटक आहे. नाटकात तीनच पात्र आहेत. निल्स बोर्ह, वर्नर हायसनबर्ग आणि बोर्हची पत्नी मार्गारेट. हायसनबर्ग 1941 साली केपनहेगनला येतो आणि बोर्हला त्यांच्या घरी भेटतो इथे नाटक सुरू होतं आणि मग आता गतप्राण झालेले हे तीन जीव आपल्याला त्या भेटीत काय घडलं असेल हे सांगू पाहातात.
‘कोपनहेगन’ हे मुळात एक चर्चानाट्य आहे. त्यातही चर्चा फिजिक्ससारख्या एका अत्यंत जटील विषयावरची आहे. मूळ नाटककार फ्रायन यांनी त्यातील जटीलता कमी करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि तसा प्रयत्न अनुवाद करताना डॉ. शरद नावरे यांनीही केलेला नाही. शिवाय डॉ. नावरे हे स्वतः थियोरेटीकल फिजिक्समध्ये पी.एचडी. केलेले डॉक्टर. फलस्वरूप ‘कोपनहेगन’मध्ये भौतिकशास्त्र खूप आहे आणि नाटकात त्याला भौतिकशास्त्र न म्हणता फिजिक्स म्हणण्याचा आग्रह आहे. हा आग्रह रास्तदेखील आहे. कारण दोन युरोपियन शास्त्रज्ञ जी भाषा बोलतील ती भाषा वापरण्याचा हा डॉ. नावरे यांचा आग्रह आहे. नाटकातल्या दोन पात्रांच्या संबंधातल्या संघर्षातही फिजिक्स आहे. कारण त्यांचे एकमेकांबद्दलचे हेवेदावेदेखील त्यांच्या कामाच्या संबंधातूनच येतात. असं असताना नाटकाच्या या जटिलतेची तीव्रता कमी करण्याचं कठीण काम नाटकाच्या नटांवर येतं. इथे ‘कोपनहेगन’ जिंकतं.
वर्नर हायसनबर्ग झालेला सागर तळाशीकर आपल्या दिमाखदार अभिनयाने जर्मन शास्त्रज्ञ कमालीच्या सहजतेने उभा करतो. बोजड शब्दांची अवघड वाक्य सागर इतक्या विलक्षण डिस्कक्शनने फेकतो की प्रेक्षकांना त्यांच्यातला मथितार्थ बिनचूकपणे समजावा. अर्थात यात दिग्दर्शकाचं श्रेयही तितकचं महत्त्वाचं आहे. पण नट म्हणून सागरने ते सगळं आत्मसात करून सादर करण्यात मिळवलेलं यश हे अत्यंत कौतुकास्पद आहे. मेघना भागवत यांची मार्गारेट बोर्ह तितकीच पटणारी आणि खरी वाटते. किंबहुना तिच्या काही वाक्यांमुळे प्रेक्षकांना काही ठिकाणी आयडेन्टीफिकेशन मिळतं. निल्स बोर्हच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक डॉ. शरद भुताडिया आहेत. हा एक असा रंगकर्मी आहे की ज्याच्यासमोर नेहमीच साष्टांग दंडवत घालावा असंच वाटतं. मुळात या अशा आशयाचं नाटक करायला धजावणं इथपासून त्यांचं रंगकर्मी म्हणून वेगळेपण दिसू लागतं. कोणतीही भूमिका असो डॉ. भुताडिया ती लीलया साकारून जातात. इथेही त्यांचा निल्स बोर्ह अत्यंत ह्युमन वाटतो.
‘कोपनहेगन’च्या निर्मितीमूल्यांमध्ये एक वेगळाच साधेपणा आहे. संपूर्ण नाटक दोन कोच, एक टीपॉय, एक अलमारी, एक पडदा, एक कोट-हॅट स्टॅन्ड आणि दोन मोडे एवढ्यावर अत्यंत प्रभावीपणे सादर होतं. सर्व पात्रांची वेशभूषा ही राखाडी रंगाच्या छटांनी केलेली आहे. त्यातून दुसर्या महायुद्धाच्या काळात उत्तर युरोपची उद्ध्वस्तता दिसून येते. ‘प्रत्यय’च्या नेहमीच्या पठडीतील सूचक प्रकाशयोजना नाटकाला अधिक ठाशीव करते.
राहता राहिला प्रश्न विषयाचा आणि भाषेच्या क्लिष्टतेचा. विषयाचा अवघडपणा हा हवा कारण वैज्ञानिक पातळीवरचे विषय पेलायला रंगभूमी आणि समाज समर्थ आहेत. मग भाषा क्लिष्ट असावी का? तर मुळात विषय जर समजला नाही तर नाटक आणि आशय पोहोचेल का? ही खरी आपल्या रंगभूमीची चाचणी आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ आइन्स्टाईन म्हणालाय की ‘ब्रिलियन्स इज इन सिम्प्लीसिटी’. त्याचा नोबेल पुरस्कार हा त्याच्या क्लिष्ट रेलेटीव्हिटीच्या सिद्धांतासाठीचा नाहीये. सूर्यकिरणांपासून ऊर्जा तयार करणार्या साध्या सरळ फोटो व्हॉटेक इफेक्टसाठी आहे. भाषा सोपी करून आशय आणि विषय अधोरेखित व्हायला हवा. ‘कोपनहेगन’ इथे थोडं हट्टी आहे, पण तगडय़ा कलाकारांनी आणि एका टेरीफिक दिग्दर्शकाने एका विलक्षण विषयावरचं मस्त नाटक सादर करून आपली मराठी रंगभूमी अधिक समृद्ध केली आहे, यात शंका नाही.
दर्जा : : ***
नाटक : कोपनहेगन
निर्मिती : प्रत्यय
लेखक : मायकल फ्रायन
अनुवाद : डॉ. शरद नावरे
दिग्दर्शक : डॉ. शरद भुताडिया
कलाकार : मेघना भागवत, सागर तळाशीकर, डॉ. शरद भुताडिया



























































