49 व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या रियाझ अकबरची विजयी दौड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

49वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या हिंदुस्थानी आयुर्विमा महामंडळाने पुरस्कृत केलेल्या हालारी विसा ओसवाल समाज हॉल, दादर येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या रियाझ अकबर अलीने डिफेन्स ऑटोमिक एनर्जीच्या जी. गावसकरला चुरशीच्या लढतीत 21-7, 3-17 व 25-4 असे हरवून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. तर जैन इरिगेशनच्या अनिल मुंढेने झारखंडच्या नानू मुखीला 25-0, 25-4 असे सहज पराभूत केले.

पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या संदीप देवरुखकरने मेजर पोर्टच्या शैलेंद्र बर्वेला 25-5, 25-4 असे हरविले. तर जैन इरिगेशनच्या माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेने चंदिगडच्या गोपाळ कक्करला 25-0, 25-1 असे हरवून दुसरी फेरी गाठली. आंतरराष्ट्रीय विजेता विदर्भाच्या इर्शाद अहमदने मणिपूरच्या एल. तैबानगनबाला 25-6, 25-7 असे नमवून आपली घोडदौड पुढे चालू ठेवली. उदयोन्मुख उत्तर प्रदेशच्या महम्मद अरिफने आसामच्या रंजीत बैस्याला 25-0, 25-7 असे नमवले.

या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुनील शिंदे, मनीषा कायंदे, बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, महाराष्ट्र ऑलिम्पिक समिती नामदेव शिरगावकर,आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे महासचिव व्ही. दि. नारायण, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, अखिल हिंदुस्थानी कॅरम महासंघाच्या महासचिव भरती नारायण, महाराष्ट्र कॅरम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र शहा, कार्याध्यक्ष भारत देसडला आणि सचिव यतीन ठाकूर हे मान्यवर उपस्थित होते. युनियन बँक, ओएनजीसी, इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम व बँक ऑफ इंडिया स्पर्धेचे सहपुरस्कर्ते आहेत.