शेतकऱ्यांचा उरलासुरला भातकवडीमोलाने व्यापाऱयांच्या घशात जाणार

596

परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची शेतातच माती झाली आहे. खर्च निघेल की नाही अशी भयंकर परिस्थिती चांद्यापासून बांद्यापर्यंत आहे. मात्र असे असताना भात खरेदी केंद्राच्या नावाखाली पुन्हा एकदा प्रशासनाने गोंधळ घातला आहे.  60 ते 70 हजार बारदानाची गरज असताना शहापुरात केवळ 6 हजार  बारदाने असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोनच दिवसांत  ही केंद्रे पोत्यांअभावी बंद पडणार असल्याने शेतकऱयांना नाइलाजाने कवडीमोल भावात आपले धान्य व्यापाऱयांच्या घशात घालावे लागणार आहे.

राज्यात सर्वच ठिकाणी सुरुवातीला उशिराने हजेरी लावलेल्या पावसाने नंतर समाधानकारक बरसात केली. त्यामुळे या वर्षी पिके जोमाने तरारली होती. मात्र बेभरवशी पावसाने परतीच्या वेळी दगाफटका केला. अनेक ठिकाणी धुवाधार झालेल्या पावसाने उभी पिके आडवी झाली. नोव्हेंबर उजाडला तरी पावसाने उसंत घेतली नाही. या अस्मानी संकटाने  शेतातच पिके कुजली. हातातोंडाशी घास हिरावल्याने आता वर्षभर खायचे काय, असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. यामुळे उरलेसुरले धान वेळीच सरकारने विकत घ्यावे याकरिता शहापुरातील शेतकऱयांनी आवाज उठवत तालुक्यात सहा ठिकाणी एकाधिकार भात खरेदी केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे, परंतु ही केंद्रे सुरू होण्याआधीच आदिवासी विकास महामंडळाने नेहमीचेच छापील उत्तरे देत सहा ते सात हजार पोती उपलब्ध असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात 60 ते 70 हजार बारदानांची गरज आहे. चार दिवसांत त्याची व्यवस्था झाली नाही तर ही केंद्रे लगेच बंद करावी लागतील आणि नाइलाजाने शेतकऱयांना आपले भिजलेले धान्य 800 ते 1000 रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापाऱयांना विकावे लागणार आहे.

पावसाने भिजून झालेल्या नासाडीपासून उरलेल्या भाताची काही खासगी व्यापाऱयांनी कवडीमोल भावात खरेदी सुरू केली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आदिवासी विकास महामंडळाने लवकरात लवकर भात खरेदी केंद्रे सुरू करावीत.

-संतोष शिंदे, जिल्हा उपसंपर्कप्रमुख शिवसेना.

प्रतिक्विंटलमागे दर वाढले.. मात्र उपयोग काय?

भाताला या वर्षी 1815 रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा दर 65 रुपयांनी अधिक आहे.  मात्र बारदानेच वेळेत उपलब्ध न झाल्यास शेतकऱयांना नाइलाजाने व्यापाऱयांची पायरी चढावी लागणार आहे. त्यामुळे दर वाढवून उपयोग काय, असा सवाल शहापूरकरांनी केला आहे.

प्रथमच नाचणी खरेदी होणार

आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर उपप्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत शहापूर, मुरबाड व कर्जत तालुक्यांतील एकाधिकार खरेदी केंद्रांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी या वर्षीपासून नाचणी खरेदी केली जाणार असून प्रतिक्विंटल 3150 रुपयांचा दर निश्चित केला आहे. त्यामुळे नाचणीचे पीक घेणाऱया शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या