
मुंबई-गोवा महामार्गावर चोळई गावाच्या हद्दीत आज रात्री उशिरा रेतीने भरलेला डंपर रिक्षावर उलटला. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून रिक्षाचादेखील चेंदामेंदा झाला. अपघात होताच स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले, पण रिक्षातील प्रवासी वाचू शकले नाहीत. ठार झालेल्यांमध्ये तीन लहान मुली व चालकाचा समावेश आहे.
गोरेगाव येथील रिक्षा रात्री साडेनऊच्या सुमारास चोळई गावातून जात होती. त्याच वेळी मागून रेतीने भरलेला डंपर आला आणि तो थेट रिक्षावर उलटला. रेतीखाली संपूर्ण रिक्षा दबली गेली. त्याखाली गुदमरून चौघांनाही आपला जीव गमवावा लागला. त्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत. हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.





























































