
सामना प्रतिनिधी । मुंबई
पवईच्या हिरानंदानी परिसरात धावत्या रिक्षामध्ये जापनीस नागरिकाला लुटण्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला गुन्हे शाखेच्या युनिट-7 च्या पथकाने अटक केली. चालकाने जापनीस नागरिकाजवळील डॉलर व अन्य साहित्य लुटण्याचा प्रयत्न केला होता.
24 फेब्रुवारी रोजी जापनीस नागरिकाने घाटकोपरच्या आर सिटी मॉलमध्ये जाण्यासाठी हिरानंदानी येथे रिक्षा पकडली. रिक्षा कैलास कॉम्प्लेक्सजवळ येताच रिक्षाचालक मोहम्मद रशिद उर्फ पोपट फारुक मुजावर हा जापनीस नागरिकाकडील डॉलर व अन्य साहित्य लुटण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने प्रतिकार करताच पोपट रिक्षा सुसाट नेऊ लागल्यामुळे त्याने धावत्या रिक्षातून उडी टाकून आपली सुटका करून घेतली व पार्कसाईट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर युनिट-7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे, पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर, एपीआय संतोष मस्तूद, उपनिरीक्षक संजय सुर्वे व पथकाने शोधमोहीम राबवून रिक्षाचालक पोपट मुजावर याच्या मुसक्या आवळल्या. पोपट हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्या विरोधात घाटकोपर, पवई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.




























































