
विनापरवाना रिक्षा चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा रिक्षा कारवाईसाठी उभा केला होता. रिक्षाचा फोटो का काढला. असा वाद घालून वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदाराला ‘एक एकर शेत विकीन, हर्मूलमध्ये जाईन पण तुला बघून घेईन !’ अशी धमकी देत अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या रिक्षाचालकाविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
क्रांतीचौक वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अतुलसिंग चंदलाल बमणावत (40, रा. तिरुपती सोसायटी, जालाननगर) हे 1 मे रोजी सकाळी 10 वाजता सतीश प्रेट्रोलपंप, जिल्हा न्यायालयाजवळील सिग्नलवर कतर्व्य बजावत होते. यावेळी रहेमान रफिक पठाण (30, रा. भारतनगर) हा तिथे रिक्षा घेऊन आला. यावेळी बमणावत हे सहकाऱ्यांसोबत सिग्नलजवळ वाहतूक नियमनाचे काम करत होते. रहेमान पठाणच्या रिक्षाचा (एमएच-20-ईके-6805) मागचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे त्यांनी रिक्षाचा पाठीमागून फोटो काढला. हा प्रकार रहेमान याने आरशात पाहिला. आपल्यावर ई-चालान मशीनद्वारे कारवाई होऊ शकते हे त्याच्या लक्षात आले. रिक्षा बाजूला लावून बमणावत यांच्याकडे आला व ‘फोटो का काढला’ म्हणत वाद घालू लागला. पोलिसांनी त्याला रिक्षा चालविण्याचा परवाना मागितला. मात्र, त्याच्याकडे तोही नव्हता. रहेमान याने पोलिसांना थेट धमकी दिली की, ‘मला पावती आली तर तुला बघून घेतो’. त्यावर बमणावत यांनी अधिकृत कारवाई सुरू करताच रिक्षाचालकाने त्यांचा मोबाईल हिसकावून अश्लील व जातिवाचक शिवीगाळ करत धमक्या दिल्या. इतकेच नव्हे, तर त्याने ई-चालान मशीनदेखील हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात गर्दी जमली होती. शेवटी रिक्षाचालक रहेमान याला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत क्रांतीचौक पोलीस ठाण्यात आणले. ठाण्यात आल्यानंतरही त्याने नाव व पत्ता सांगून पुन्हा एकदा शिवीगाळ करून पोलिसांना धमकावले. या प्रकरणी बमणावत यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.