
सामना ऑनलाईन, मुंबई
बऱ्याचदा प्रवासी त्यांचे सामान रिक्षा-टॅक्सीत विसरतात. अशा वेळी चालकांनी प्रामाणिकपणा दाखवत प्रवाशांचे सामान परत करावे यासाठी जुहू पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार रिक्षाचालकाने प्रवाशाचे महत्त्वाचे साहित्य पोलिसांना परत केले. अतुल कोरगावकर हे सोमवारी रात्री ओशिवरा येथून जुहूला येण्यासाठी रिक्षात बसले. त्यांचे बँक पासबुक, धनादेश आदी दस्ताऐवज रिक्षात विसरले. कोरगावकर तक्रार देऊन पोलीस ठाण्याबाहेर पडणार तेवढय़ात रिक्षाचालक रामनरेश वर्मा हा त्यांचे दस्ताऐवज घेऊन तेथे आला. रामनरेशने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी दोन हजार रोख व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला.


























































